*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इंद्रधनूची कमान सुंदर*
वृत्त : समुदितमदना
मात्रा : आठ + आठ + आठ +तिन
श्रावणमासी अंगणामधे ऊन कोवळे पडे
इंद्रधनूचे सुंदर दर्शन त्या मध्ये मग घडे
निळ्या,सावळ्या,हिरव्या,पिवळ्या जमून आल्या छटा
रंभेच्या का केसा मधल्या नाजुक सुंदर बटा
बघता त्याला जागेवरती पाय जरासा अडे
इंद्रधनूचे सुंदर दर्शन त्या मध्ये मग घडे
जिकडे तिकडे रानफुलांचे कुणी टाकले सडे
हिरवाईचे दर्शन देती उंच डोंगरी कडे
विहंगासवे सप्तसुरांची मैफिल येथे झडे
इंद्रधनुचे सुंदर दर्शन त्या मध्ये मग घडे
‘रफार : हा का ‘ स्वर्गा’ मधल्या शब्दाचा हा दिसें
दुपार सरता काय शोधतो कुठे हरवले कसे
स्वर्गामधल्या रुपवतीचे हे तर दिसते कडे
इंद्रधनूचे सुंदर दर्शन त्या मधे मग घडे
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
मोबाईल 9130861304
