*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी कोल्हटकर “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*तीन चाकी*
‘तीन चाकी’, ‘ऑटो’, ‘रिक्षा’ ही विविध संबोधने नियमित ऐकू येतात. अत्यंत साधेपणा असलेले हे वाहन कुठेही, कधीही उपलब्ध होऊ शकते. शहर असो वा गांव रिक्षा इकडून तिकडे फिरत असतात. काही ठिकाणी या वाहनाची भाडे-आकारणी स्वतंत्रपणे मीटरवर होत असते, तर काही ठिकाणी याच वाहनांतून वेगवगळे प्रवासी भाडे शेअर करून जात असतात. बस थांब्यावर जास्त वेळ थांबायला लागले तर प्रवासाचा हा एकमेव आधार असतो. रणरणत्या उन्हांत, कोसळत्या पावसांत रिक्षाचालक अखंड फेऱ्या करत असतात, मागणी प्रचंड असते. कुठलाही बंदिस्तपणा या वाहनांस नसतो. त्यांतूनही चालक अनोळखी असेल तर, “जेवण, नाष्टा, चहा झाला का?” हा प्रश्न आपुलकी निर्माण करतो. साहजिकच प्रवास सुखकर होतो.
असाच एकदा प्रवास करताना, घरी परतताना नाष्ट्यासाठी वडा-पाव घेत होते. रिक्षावाले दादाही माझ्यासोबत थांबले, मी त्यांना जो वडा-पाव दिला तो त्यांनी स्वतःजवळच्या पिशवीत ठेवला कारण विचारताच, “माझ्या लेकीला वडा-पाव फार आवडतो, तिच्यासाठी घेऊन जातो ताई.” या वाक्यानंतर मनांतूनच पितृप्रेमाला नमस्कार केला. कोणत्याही प्रहरी हे वाहन सोयीचे ठरते, सध्याची अपार वाढत चाललेली महागाई, शोधावे लागणारे पार्किंग, त्यांत जाणारा वेळ यांचाच विचार करावासा वाटतो. बऱ्याचदा असे आढळून येते की, अनेक चांगल्या कुटुंबातील लोक सुद्धा या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. कारण घरांत बसून काय करायचे ? तेवढेच लोकांशी बोलता येते, ओळखी भरपूर वाढतात, दिवसभर किंवा दिवसांतला काही वेळ बाहेर घालवता येतो असा विचार सामोरा येतो.
ऐंशी-नव्वद च्या दशकांत या वाहनाला एक वेगळेच महत्व होते. रिक्षा स्टॉप घराजवळ असला की सोयीचे वाटायचे. घरी आलेल्या पाहुण्यांना परत जाताना रिक्षा आणून देण्याचे काम घरची लहान मुले करत असत. सुट्टीत गावांला जायचे तर प्रवासाची सुरवांत रिक्षाने व्हायची. शहरांत कुठेही फिरताना, बाहेरून घरी परतताना हे वाहन रस्त्यावरून धावत असते. आजमितीस जरी स्वत:चे वाहन असले तरी कधीतरी छोट्या अंतरासाठी “रिक्षा पकडून येतोय तिकडं” असे शब्द भररस्त्यांत ऐकायला मिळतात. बसच्या वेळा किंवा थांबे माहिती नसताना, मध्येच कुठेतरी हात दाखवल्यावर हे वाहन थांबते आणि कामकाजाचा वेळ वाचण्यास मदत होते. एखादी घटना, अनुचित प्रकार रिक्षाचालकांच्या सहाय्याने काही प्रमाणांत उघडकीस येतात.
कोणताही व्यवसाय करताना, विशेषतः भाजीविक्रेते, फळविक्रेते यांच्यासाठी तर मालाची ने-आण करत असताना रिक्षा-ऑटो अत्यंत उपयोगी ठरते. रोजचाच व्यवसाय सांभाळताना वाहनशोध करण्यापेक्षा स्वत:ची रिक्षा असणे सोयीचे ठरते. सणासुदीच्या दिवसांत रात्री शहरांत फिरताना, ठिक –ठिकाणी दिसणारे सर्वत्र संचार असलेले हे वाहन आणि त्याचे सारथ्य करणारा समाजांतील महत्वपूर्ण घटक आहेत. ज्या लहान शहरांमध्ये अजून कॅबची सोय झालेली नाही तिथे तर हे वाहन रथासारखे वाटते. ठरलेले भाडे दिले, उतरलो की काम संपले. असे असले तरी ग्रामीण भागांत रिक्षाचालकांना सर्व घरे, तिथे वास्तव्य करणारे लोक कुटुंबाप्रमाणेच असतात. पत्ता तर सांगावाच लागत नाही, त्या व्यक्तीचे नांव सांगितले तरी घरी नेऊन सोडतात. “चाकं तीन असली तरी समतोल राखण्याचं कार्य, मग तो सामाजिक, वैचारिक कोणताही असो हे वाहन आणि त्यांचे चालक सदोदित करत असतात.”
© मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
मोबाईल : ९८३४८२४०१६
