You are currently viewing गोमाता

गोमाता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*गोमाता*

 

आपण हिंदुधर्मीय गाईला माता मानतो, अर्थातच तिचे सर्वतोपरी रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

 

देवी माता,अंबा माता, दुर्गा माता तशीच ही गोमाता.

लहानपणी आम्ही एक गाणे म्हणत असू.

” दत्त दत्त दत्ताची गाय

गाईचं दूध

दुधाचं दही

दह्याचं ताक

ताकावरचं लोणी

लोण्याचा तूप

तुपाची बेरी

बेरीची माती

मातीचा गणपती

गणपतीची घंटा

घण घण घण ”

म्हणजे बघा या गाण्यात सुद्धा

गाईपासून सुरुवात करून आपण गणपतीकडे येतो.

आपली दूध दही तुपाची ही रोजची गरज गोमाता भागवते. आपले आरोग्य त्यामुळे चांगले राहते. म्हैसही, आपल्याला दूध देते, परंतु गाईचे दूध अधिक आरोग्यवर्धक आहे. आजची पिढी तर खाण्यापिण्याच्या बाबतीत इतकी जागृत झाली आहे की घरोघरी गायीच्या दुधाचा वापर होत असलेला आपण पाहतो. कारण गाईच्या दुधात अल्प प्रमाणात चरबी असते.

 

आपण हिंदू संस्कृती जोपासणारे लोक. ब्रह्मा विष्णू महेश गणपती दत्तात्रेय देव देवता

अशा अनेक देवांची पूजा करणारे आपण. आपली अशी श्रद्धा आहे की गाईच्या उदरात

३३ कोटी देवांचा वास असतो. असे असेल तर एका गाईला केलेला नमस्कार सगळ्याच देवांप्रति पोहोचतो नाही का?

 

एका भगवंताला मानणारे आपण. तो कोण होता? गुराखी, गवळी. गाई चरायला नेणे

हा त्याचा रोजचा उद्योग, आणि दूध दही लोणी हा त्याचा आहार. भगवंताच्या सगळ्याच वस्तू म्हणजे साक्षात परब्रम्ह. त्या परब्रम्हाची पूजा करणे, पर्यायाने त्यांचे रक्षण करणे हे आपले परम कर्तव्य आहे.

 

अश्विन कृष्ण द्वादशीला आपण गाय व तिचे वासरू यांची पूजा करतो. त्या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. याच दिवसापासून आपली हिंदूंची दिवाळी सुरू होते. पण माझ्या मते वर्षातून एक दिवस अशी पूजा करून काय साध्य होणार?

 

पूर्वी भोजना आधी गोग्रास बाजूला काढण्याची प्रथा होती. जसा देवाला नैवेद्य दाखवतात तसाच हा गोग्रास. असे म्हटले जायचे की गोमातेची रोज पूजा केली, तिला घास दिला की घरी दारी सुख समृद्धी आणि शांती नांदते. आता शहरात तर गाई दिसत सुद्धा नाहीत. कधी घरात काही धार्मिक कार्य असले तर भटजी गायीचा घास काढावयास सांगतात. तो काढून ठेवलेला घास गाईला देण्यासाठी कुठेतरी दूर जाऊन गाय शोधावी लागते.

 

काही लोकांनी मात्र त्यांच्या चरितार्थाचा एक व्यवसाय केलेला आपल्याला दिसतो. एखाद्या ठराविक ठिकाणी एखादी बाई किंवा बुवा एक गाय आणि चारा व कसले तरी मोठे मोठे लाडू घेऊन बसलेली दिसते. तिला लाडवाचे आणि चाऱ्याचे ठराविक पैसे दिले की ती तिच्या गाईला तो घास भरवते आणि पैसे दिलेला माणूस पुण्य पदरी पडले या भावनेने त्याच्या पुढील मार्गाला लागतो.

एका बाजूने विचार करता ही गोष्ट नक्कीच चांगली आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही.

 

या आधुनिक काळात जग फार जवळ आले आहे. त्यामुळे आचार विचारांची जरा जास्तच देवाण-घेवाण होते असे माझे मत आहे. इथे अमेरिकेतील लोकांना भारतीय संस्कृती आदरणीय वाटत असल्याचे दिसते तर या उलट भारतात पाश्चिमात्य सवयी अंगीकारण्याची फॅशन दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिझ्झा बर्गर खाण्यासाठी मॉल मधील फूड कोर्ट मध्ये मुलांची व तरुण वर्गाची झुंबड लागलेली दिसते. पिझ्झावर घातलेले पेपरोनी आणि बर्गर साठी वापरलेले गोमांस ही माणसे मिटक्या मारीत खाताना आपण पाहतो. कायद्याने बंदी घातली तरी कायदा धाब्यावर बसवण्यात ही मंडळी अगदी माहीर आहेत.

गोमांस भक्षण करणे या गोष्टीचा निषेध झालाच पाहिजे. आपल्या पूज्य मातेचा कोणी असा वध करतो का?

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा