You are currently viewing सावंतवाडीत गंजिफा चित्रशैलीला मिळणार नवसंजीवनी!

सावंतवाडीत गंजिफा चित्रशैलीला मिळणार नवसंजीवनी!

सावंतवाडीत गंजिफा चित्रशैलीला मिळणार नवसंजीवनी!

बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; नगराध्यक्ष श्रद्धा भोसले विद्यार्थ्यांना देणार गंजिफा कलेचे प्रशिक्षण

सावंतवाडी

पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याच्या उद्देशाने बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा चित्रशैलीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक कलेसोबतच पारंपरिक लोककला आणि चित्रशैलीची ओळख व्हावी, या उद्देशाने नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. त्या स्वतः गंजिफा चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या क्षेत्रातील अनुभवी कलाकारही प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत.
आकाशकंदील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. नवीन कला आत्मसात करताना आपल्या पारंपरिक लोककलांचा वारसाही जपणे आवश्यक आहे. जुन्या कलापरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी संस्थानच्या समृद्ध लोककलेचा वारसा लाभलेल्या गंजिफा चित्रशैलीला नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या पारंपरिक कलेचे बारकावे शिकण्याची संधी मिळणार असल्याने कला क्षेत्रातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
यावेळी संस्थाध्यक्ष रमेश भाट, श्याम भाट, प्रकाश मसूरकर, गोविंद बांदेकर, अनुराधा परब, नकुल परसेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा