जिल्हास्तरीय हातोडा फेक स्पर्धेत सर्वेश मोडक प्रथम
बोर्डवे गावासह कसाल हायस्कूलचा नावलौकिक वाढविणाऱ्या सर्वेशचा चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हस्ते सत्कार
बोर्डवे :
बोर्डवे गावचा सुपुत्र आणि कसाल हायस्कूलचा विद्यार्थी सर्वेश मोडक याने जिल्हास्तरीय हातोडा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल कसाल शिक्षण संस्थेचे संचालक तथा शिवसेना कळसुली विभागप्रमुख चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हस्ते सर्वेशच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्वेशला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पेढे आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या सत्कार समारंभाला बोर्डवे येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य महादेव राठवड, माजी उपसरपंच संतोष उर्फ बाबू राणे, मुकेश मोडक, निलेश परब, विराज येनडे, विठोबा राठवड तसेच मोडक परिवार उपस्थित होता.
सर्वेशने मिळविलेले हे यश संपूर्ण बोर्डवे गावासह कसाल हायस्कूलसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. तसेच सर्वेशने क्रीडा क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घेत शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
