सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान! – पद्मश्री गिरीश प्रभुणे*
पिंपरी
‘सामाजिक सलोखा हे देशाचे बलस्थान असून लेखक – कवींनी आपल्या साहित्य अभिव्यक्तीतून या विचाराला बळकटी देण्याचे कार्य करावे!’ असे आवाहन साहित्यिक आणि ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि तीर्थ पब्लिकेशन आयोजित साहित्य स्वानंद दिवाळी अंक २०२६ चे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष मानसी चिटणीस, संपादक महादेव कोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, ‘अर्थवाही मुखपृष्ठासह वैविध्यपूर्ण साहित्य आविष्कारामुळे ‘साहित्य स्वानंद’ हा दिवाळी अंक दर्जेदार अन् संग्राह्य झाला आहे.’ ॲड. सतीश गोरडे यांनी, ‘केवळ मनोरंजन हा साहित्यनिर्मितीचा हेतू नसून समाजप्रबोधनाचे ते प्रभावी साधन आहे!’ असे मत व्यक्त केले. महादेव कोरे यांनी आपल्या मनोगतातून साहित्य स्वानंद या दिवाळी अंकाची तेरा वर्षांची वाटचाल कथन केली.
प्रकाशन सोहळ्यानंतर खास दीपावलीनिमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवी सुरेश कंक यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे पंचवीस कवींनी वेगवेगळ्या आशयविषयातील कवितांनी उपस्थितांची दाद मिळवली. यामध्ये शोभा जोशी, चंद्रकांत धस, राधाबाई वाघमारे, सुहास घुमरे, फुलवती जगताप, नितीन यादव, सीमा गांधी, वैभव धस, शामराव सरकाळे, जयश्री श्रीखंडे, अशोक सोनवणे, सीमा बोबडे, सुभाष चव्हाण, नीलिमा जोशी, राजेश चौधरी, शरयू कुलकर्णी, रेवती साळुंखे, नरेंद्र चव्हाण, श्रद्धा चटप, चंद्रकांत, स्नेहा पाठक, दिलीप अहिरे, रेखा दुसाने यांचा समावेश होता. सुरेश कंक यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘दिवाळीचा फराळ जसा षड्रसयुक्त असतो तसेच कवींनी नवरसाचा परिपोष करावा’ , असे विचार व्यक्त करून ‘आरोग्य’ या कवितेचे दमदार सादरीकरण केले. समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेचे सदस्य आणि कोरे परिवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मानसी चिटणीस यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
