कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार!
उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची दुर्गम शाळेला भेट; कंपाऊंड वॉलसह रस्त्याच्या कामांबाबतही दिले आश्वासन
दोडामार्ग :
तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभवडे येथे शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे, शैक्षणिक सुविधा आणि विविध मूलभूत समस्यांबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शिक्षक गोरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या भौतिक गरजा आणि शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांची दोन पदे रिक्त असून ती तातडीने भरण्यात यावीत, तसेच शाळेला कंपाऊंड वॉल बांधून मिळावी, अशी मागणी केली.
याशिवाय तळकट-कुंभवडे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे, वनहद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूची झाडी साफ करणे, अशा विविध मागण्याही ग्रामस्थांनी मांडल्या.
यावर उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येतील, तसेच उर्वरित विकासकामेही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून ती मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यावेळी दादा देसाई, भगवान गवस, नारायण देसाई, विजय गावडे, मधुकर गावडे, सिताराम परब, बाळकृष्ण गावडे यांच्यासह माता-पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
