तळेरे येथे डंपरच्या चाकाखाली सापडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर दुर्घटना; रोहिदास देसाई यांचा जागीच मृत्यू
कणकवली :
मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावर डंपरच्या धडकेत ६० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. डंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने रोहिदास हरिश्चंद्र देसाई (वय ६०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने तळेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरून डंपर जात असताना रोहिदास देसाई हे त्याच्या मागील चाकाखाली आले. चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते डंपरच्या चाकाखाली नेमके कशा प्रकारे आले, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या दुर्घटनेची अधिक माहिती आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
