अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे व POCSO अंतर्गत दाखल गंभीर प्रकरणात आरोपीची ससन्मान निर्दोष मुक्तता
अॅड. अशपाक शेख यांच्या प्रभावी कायदेशीर युक्तिवादाला यश
वेंगुर्ला (ता. वेंगुर्ला)
येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे व तिच्याशी कथित गैरकृत्य केल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी ओम माधव बोंगाणे (वय २०, रा. पुणे) याची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १२४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ७५(१) तसेच POCSO कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी शिरोडा येथील बा. म. गोगटे कॉलेजजवळून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिली होती. पोलिसांनी तपासादरम्यान दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी सदर मुलगी बुलढाणा येथे आरोपीसोबत मिळून आल्यानंतर पुढील तपास करून आरोपीविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
ओरोस येथील मे. विशेष न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष खटला क्रमांक ५९/२०२४ ची सुनावणी सुरू असताना एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीचे मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी आरोपीची निर्दोषता ठामपणे मांडत, पीडितेला फूस लावून पळवून नेणे अथवा तिच्याशी कोणतेही गैरकृत्य केल्याचा आरोप नाकारला.
बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेली कायदेशीर बाजू व प्रकरणातील उपलब्ध साक्षी-पुरावे विचारात घेऊन, मा. न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी दिनांक ३१/१०/२०२६ रोजी आरोपी ओम माधव बोंगाणे याची सर्व आरोपांतून सन्मान निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.
सदर प्रकरणात आरोपीचे मुख्य वकील अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले असून, ॲड. नामदेव मठकर, ॲड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भुषण कदम, अॅड. हरेश वरावडेकर व अॅड. आसिम मुजावर यांनी त्यांना सहाय्य केले.
