You are currently viewing नका करू शेवट

नका करू शेवट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. अवनी आदित्य जोशी (दारशेतकर) लिखित अप्रतिम लेख*

 

*”नका करू शेवट”*

 

आपण सामान्यपणे जीवन जगत असताना, हे संपले ते संपले, शेवटी किंवा ह्याचा शेवट झाला, वेळ संपली, संदेश (मेसेज) टाकला, पोस्ट टाकली, शेवटचे दिवस, तास, सेकंद, असे अनेक शब्दात शेवट किंवा संपले असा शब्दांचा उल्लेख करत असतो.

 

एकदा विचार करून पाहा, शेवट, संपले, टाकले हे ऐकायलाही कसे वाटते? किंवा ते योग्य आहे का?

 

तर ते योग्य नाही. कोणत्याही गोष्टीचा शेवट झाला. असे म्हणू नये. तर

वेळ पूर्ण झाली.

संदेश पाठवतो, पोस्ट पाठवतो

असे म्हणावे.

 

कचरा टाकला, फेकला अस म्हंटले जाते. मग आपला संदेश काय कचरा आहे का? किंवा पोस्ट? म्हणून संदेश पाठवतो. पोस्ट पाठवतो. सामान पाठवतो. झाडांना पाणी घालतो. असे म्हणावे शक्यतो.

 

माणूस मृत्यू समयी देखील शेवटचे तास, मिनिटं, सेकंद असे म्हणू नये. कारण देह ठेवला जातो. तरी आत्मा अमर आहेच ना. म्हणजे शेवट होत नाही. तर आपण बोलण्यातून तो शेवट का करायचा??

 

माझी आजी शिक्षिका उत्तम ज्योतिषी होती. ती कायम म्हणायची, कधीही शेवटचे, संपले, टाकले असे शब्द घरात वा बाहेर आणि कधीच उच्चारायचे नाही. कारण त्या उच्चरातून निर्माण होणारी स्पंदने ही नकारात्मक वातावरण आपल्या भोवती तयार करत असतात. त्यातून नकारात्मक दृष्टीकोन हळूहळू तयार होत असतो. आणि आपल्या आजूबाजूला नकारात्मक लहरी वातावरण आपोआप तयार होते. मग कधी नैराश्य येते. मन उदास होते. म्हणून कधीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सकारात्मक बोलावे. वागावे. आणि आज्जी सांगायची ते बरोबर सांगायची असे मला वाटते.

 

घरातील मीठ, तेल, तूप, दूध हे देखील पूर्ण संपण्याची वाट पाहू नका. तर ते संपायच्या आधीच पुढील आणून ठेवा, अधिकचे आणत जा. हे देखील आजी सांगायची. घर दूधदुभत्याने भरलेले असावे ही घरची खरी श्रीमंती होती. म्हणून शेवट, संपले, डबा रिकामा झाला असे नाही झाले पाहिजे.

 

कोणी जाताना, त्यांच्यात आता काही राम नाही उरला. असे देखील म्हणू नये कारण आपल्या प्रत्येकाच्या नावाची बेरीज,गुणाकार, भागाकार, करूनही शेवटी दोन ही बाकी उरतेच म्हणजेच “राम” असतोच, आहेच आणि कायम राहील. आशा आशयाचा श्लोक आहे. त्याप्रमाणे हवं तर तपासून पण पाहता येईल हो.

 

चला तर मग सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवून सकारात्मकच बोलूया. आणि कधी कोणताही शेवट नको करूया.

 

संपले, शेवट, टाकले

असे म्हणू नका कोणी

सकारात्मक दृष्टिने

जीवन जगुया सर्वांनी

 

शेवट कधी होत नाही

कायम उरतेच बाकी

राम मनात अन हृदयात

तोच सर्व काही राखी…🙏🙏

 

सौ. अवनी आदित्य जोशी.(दारशेतकर)

तळेगांव दाभाडे

जि. पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा