इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मूलभूत वस्तू संचाचे सहाय्य; पहिल्या दोन पाल्यांना मिळणार लाभ
प्राजक्त चव्हाण यांची माहिती; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगार कुटुंबांना होणार फायदा
कुडाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजने’ला शासनाने महत्त्वपूर्ण मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचा संच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आर्थिकदृष्ट्या सामान्य परिस्थितीतील कामगार कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र शासनाने कामगारांसाठी नवीन चार कामगार संहिता लागू केल्यानंतर सामाजिक सुरक्षा संहिता २०२० अंतर्गत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने शैक्षणिक सहाय्य योजनेत सुधारणा करून शैक्षणिक साहित्य वस्तू स्वरूपात देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता.
या प्रस्तावानुसार इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना ‘मूलभूत वस्तू संच सहाय्य योजना’ अंतर्गत शैक्षणिक साहित्य संच देण्यास शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
या शैक्षणिक साहित्य संचामध्ये पाण्याची बाटली, थंड/गरम पाण्याचे थर्मास, टिफिन बॉक्स, छत्री, रेनकोट, परीक्षेसाठी पॅड, लॉग बुक, ड्रॉईंग बुक, बॉल पेन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, भूमितीचा कंपास, ऑईल पेस्टल्स, पोस्टर कलर, ब्रश संच, प्लॅस्टिक पट्टी, सोलर लॅम्प, कॅल्क्युलेटर, फोल्डिंग अभ्यास टेबल, दोन मार्करसह व्हाईट बोर्ड, गजराचे घड्याळ, शाळेची बॅग आणि किट बॅग आदी साहित्याचा समावेश आहे. या संचामध्ये एकूण २२ प्रकारच्या साहित्यांतर्गत ४९ वस्तू देण्यात येणार आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.
या योजनेला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख, अ.जा. तथा श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. प्राजक्त चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांमध्ये सुधारणा करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार नारायणरावजी राणे साहेब, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब यांचे समस्त कामगारांच्या वतीने प्राजक्त चव्हाण यांनी आभार व्यक्त केले आहेत.
या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांना थेट लाभ मिळणार असून, अधिक माहितीसाठी श्रमिक संघटनेच्या सेवा संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्राजक्त चव्हाण यांनी केले आहे.
