You are currently viewing मांगवली येथे ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

मांगवली येथे ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

मांगवली येथे ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

दुग्ध व्यवसाय, पशुधन आरोग्य, विमा संरक्षण आणि चारा व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वैभववाडी :

शेतकरी व पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग वैभववाडी, पंचायत समिती वैभववाडी आणि सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन सुवर्णसिंधू गिर गोशाळा, मांगवली (संसारेवाडी) येथे करण्यात आले. या मेळाव्यात दुग्ध व्यवसाय, दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन, पशुधनाचे आरोग्य, विमा संरक्षण आणि चारा निर्मिती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, देवानंद पालांडे, आत्माचे अध्यक्ष मंगेश कदम, गोकुळ दूध संघाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. पी. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. निमुणकर, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, राजेंद्र राणे, आत्मा समिती सदस्य शारदा कांबळे व महेश संसारे, सामाजिक वनीकरण विभागाचे अंकित काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.
युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे : एम. पी. पाटील
दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन व आहार नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना गोकुळ दूध संघ, कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. पी. पाटील यांनी युवकांनी दुग्ध व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. मर्यादित जागेत मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करून दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर कसा करता येतो, याची माहिती त्यांनी दिली.
जनावरांचे संतुलित आहार व्यवस्थापन, दूध उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच मुरघास निर्मिती व वापरातून चाऱ्याची टंचाई कशी दूर करता येते, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शहरात नोकरीच्या शोधात जाण्याऐवजी गावातच नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न मिळविता येते. दुग्ध व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या युवकांची उदाहरणेही त्यांनी यावेळी दिली.
पशुधनाचे आरोग्य आणि विमा संरक्षणाचे महत्त्व
पशुधनातील आजार व विमा संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. स्वप्नील आंबी यांनी जनावरांमध्ये आढळणारे विविध आजार, त्यांची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कोकणातील हवामान व स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनाची काळजी कशी घ्यावी, जनावरांना आजार होऊ नयेत यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शासनाच्या पशुधन विमा योजनेचे महत्त्व स्पष्ट करताना विम्यामुळे पशुपालकांना संभाव्य आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. पशुधनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचा विमा उतरविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
चारा निर्मिती योजनेची माहिती
पंचायत समिती वैभववाडीचे श्री. सकपाळ यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) चारा निर्मिती योजनेचे स्वरूप, त्यातील तरतुदी आणि उपलब्ध अनुदान याबाबत माहिती दिली. चारा उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
अधिकारी, पदाधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती
या मेळाव्याला गोकुळ दूध संघाचे पर्यवेक्षक राजेश गावकर व भगवंत गावडे, आत्मा समितीचे सदस्य, विस्तार अधिकारी कांता जाधव, आत्माचे बीटीएम राकेश हुले, मांगवली ग्रामपंचायतीच्या प्रशासक कांबळे मॅडम, दुग्ध विकास संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग व पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पशुपालन, चारा व्यवस्थापन आणि शासकीय योजनांची माहिती मिळाली. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा