You are currently viewing “बाप स्वतः जळतो मुलांसाठी उजेड करतो!”

“बाप स्वतः जळतो मुलांसाठी उजेड करतो!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*”बाप स्वतः जळतो मुलांसाठी उजेड करतो!”*

(मरण हा पर्याय नाही)

 

अलीकडे संभाजीनगर येथे एका एकोणीस वर्षांच्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मन हेलावून टाकणारी आहे. अशा घटना घडल्या की मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. एवढ्या कोवळ्या वयात आयुष्य संपवण्याचा विचार मनात का येतो? एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, अपेक्षा पूर्ण झाली नाही, कौटुंबिक वाद झाला किंवा हवी ती वस्तू मिळाली नाही म्हणून आयुष्य संपवणे हा खरोखरच पर्याय असू शकतो का?

 

माझे ठाम उत्तर आहे नाही! मुळीच नाही!कारण आयुष्य म्हणजे केवळ आजची परिस्थिती नाही.आयुष्य म्हणजे उद्याची शक्यता आहे. आजचा अंधार कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, वेळ बदलते आणि त्याबरोबर आयुष्यही बदलते. म्हणूनच एका क्षणाच्या दुःखासाठी संपूर्ण आयुष्य गमावणे ही स्वतःवर केलेली सर्वांत मोठी अन्यायाची गोष्ट आहे.

 

आपण एक गोष्ट मात्र विसरतो मुलांच्या स्वप्नांसाठी आई-वडील किती मोठी किंमत मोजत असतात,याची जाणीव मुलांना अनेकदा होत नाही.एक साधा, सर्वसामान्य बाप असतो. खासगी क्षेत्रात नोकरी करणारा असो, शेतात राबणारा असो, मजुरी करणारा असो किंवा छोटासा व्यवसाय करणारा असो; त्याचे एकच स्वप्न असते आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा चांगले आयुष्य जगावे.तो स्वतःच्या हौसमौजेला आवर घालतो. स्वतःसाठी नवीन कपडे घेत नाही; पण मुलाला चांगले कपडे घेऊन देतो. स्वतःच्या गरजा पुढे ढकलतो; पण मुलाची शाळेची किंवा कॉलेजची फी वेळेवर भरतो. स्वतःच्या खिशात पैसे नसले तरी मुलाच्या गरजेच्या वेळी उधार-उसने करून त्याची गरज भागवतो.

 

मुलाला मोबाईल हवा असतो तो देण्याचा प्रयत्न करतो. मोटारसायकल हवी असते ती घेण्यासाठी कर्जाचा विचार करतो. चांगल्या शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवायचे असते त्यासाठी घरातील खर्च कमी करतो.

कधी कधी स्वतःच्या ताटातला एक घास कमी करून मुलाच्या ताटात चार घास वाढणारा हा बाप असतो.

पण बाप हे सगळे का करतो?

त्याला श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे नसते. त्याला समाजात आपली प्रतिष्ठा दाखवायची नसते. त्याला फक्त एवढेच वाटत असते की, “माझ्या वाट्याला आलेले कष्ट, माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत.” ज्या उन्हात तो भाजला, त्या उन्हाची झळ मुलांना लागू नये.

ज्या अडचणी त्याने सोसल्या, त्या मुलांना सोसाव्या लागू नयेत.

ज्या अभावातून तो मोठा झाला, त्या अभावात मुलांनी वाढू नये.

 

यासाठीच बाप राबत असतो.

 

बापाच्या आयुष्यातही दुःख असते. त्यालाही चिंता असतात. त्यालाही अपमान सहन करावा लागतो. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे बोलणे खावे लागते. कामाच्या ठिकाणी मनाविरुद्ध परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. कधी पगार कमी पडतो,कधी कर्जाचा हप्ता डोक्यावर असतो,कधी घरखर्चाची चिंता असते.पण तरीही तो घरी येतो.दारातून आत येताना चेहऱ्यावर हसू आणतो.मुलांसमोर हसतो.पत्नीसमोर हसतो.

घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो.

कारण त्याला आपल्या वेदनांचे ओझे मुलांच्या खांद्यावर ठेवायचे नसते.बापाच्या डोळ्यांत पाणी असते; पण तो मुलांच्या डोळ्यांत स्वप्न पाहत असतो.त्याच्या स्वतःच्या इच्छा कुठेतरी मागे पडलेल्या असतात; पण मुलांच्या इच्छांना तो पुढे नेत असतो.

म्हणूनच कधी तरी थांबा आणि स्वतःला विचारा.

“माझ्यासाठी माझा बाप किती कष्ट करतो?”

हा प्रश्न मनापासून विचारला, तर अनेक हट्ट आपोआप कमी होतील.

 

आजच्या तरुणाईसमोर एक वेगळेच आव्हान आहे. सोशल मीडियावर दिसणारे जीवन, मित्रांकडे असणाऱ्या महागड्या वस्तू, मोठ्या गाड्या, महागडे मोबाईल, पार्ट्या, सहली आणि दिखाऊ श्रीमंती पाहून स्वतःचे आयुष्य त्याच मापाने मोजण्याची चूक अनेकदा होते.

“माझ्या मित्राकडे आहे, मग माझ्याकडे का नाही?”

हा प्रश्न चुकीचा नाही; पण त्याचे उत्तर शोधण्याची पद्धत चुकीची असू शकते.मित्राकडे महागडा मोबाईल आहे म्हणून आपल्याकडेही असलाच पाहिजे, असे नाही. मित्र पार्टी करतो म्हणून आपणही करायलाच हवी, असे नाही. कोणीतरी सुखात दिसतो म्हणून त्याच्यासारखेच जीवन आपल्यालाही जगता आले पाहिजे, असे नाही.प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते.प्रत्येक बापाची कमाई वेगळी असते. प्रत्येक कुटुंबाची क्षमता वेगळी असते.

म्हणून तुलना करू नका.

तुमच्या आई-वडिलांची परिस्थिती समजून घ्या.बाप गावाकडे शेतात राबत असेल, मजुरी करत असेल आणि तुमच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत असेल, तर त्या पैशातून तुम्ही काय करता, याचाही विचार करा.शिक्षणाच्या नावाखाली शहरात किंवा बाहेरगावी जाऊन पालकांच्या कष्टाच्या पैशावर मौजमजा करणे, पार्ट्या करणे आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे हा स्वातंत्र्याचा अर्थ नाही.

स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीसुद्धा!

 

आई-वडिलांनी तुमच्यावर विश्वास ठेवून पैसा दिला आहे. त्या पैशामागे त्यांच्या घामाचा वास आहे, त्यांच्या कष्टांची कहाणी आहे आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा हिस्सा आहे.तो पैसा फक्त पैसा नसतो.तो बापाचा घाम असतो.आईची बचत असते.

घरातील त्याग असतो.आणि तुमच्यासाठी पाहिलेले भविष्य असते.म्हणून मुलांनी आई वडिलांच्या कष्टांची किंमत ओळखली पाहिजे.

पण इथे एक गोष्ट पालकांनीही लक्षात घ्यायला हवी.

मुलांनी प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणेच वागले पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणेही योग्य नाही. प्रत्येक मुलाच्या मनात वेगळे प्रश्न असतात. त्यांच्यावर अभ्यासाचा, करिअरचा, मित्रमैत्रिणींचा, नातेसंबंधांचा आणि भविष्याचा ताण असू शकतो.म्हणून मुलांनी आई-वडिलांशी बोलले पाहिजे आणि आई-वडिलांनीही मुलांचे बोलणे शांतपणे ऐकले पाहिजे.

फक्त ओरडून प्रश्न सुटत नाहीत.

कधी मुलाला उपदेशापेक्षा एक मिठी हवी असते.कधी उत्तरापेक्षा ऐकून घेणारा कान हवा असतो.

कधी उपायापेक्षा “मी तुझ्यासोबत आहे” एवढे चार शब्द पुरेसे असतात.

 

मुलाच्या मनात काहीतरी गंभीर चालले आहे असे जाणवले, तर त्याला एकटे सोडू नका. त्याच्याशी बोला. त्याचे म्हणणे ऐका. गरज भासल्यास विश्वासू व्यक्ती, शिक्षक, समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

मदत मागणे ही कमजोरी नाही; उलट स्वतःला वाचवण्याची ताकद आहे.आणि मुलांनो, हे कायम लक्षात ठेवा.मनासारखे झाले नाही म्हणून जीवन संपवायचे नसते.

मनासारखे मिळाले नाही म्हणून स्वप्न सोडायचे नसते.

अपयश आले म्हणून स्वतःला संपवायचे नसते.तुम्हाला हवे ते आज मिळाले नाही, याचा अर्थ ते कधीच मिळणार नाही असे नाही.

आज तुमच्याकडे पैसा नसेल; उद्या तुम्ही कमवू शकता.

आज तुमच्याकडे संधी नसेल; उद्या तुम्ही संधी निर्माण करू शकता.

आज तुम्ही अपयशी असाल; उद्या तुम्ही यशस्वी होऊ शकता.

पण एकदा आयुष्य संपवले, तर उद्याची एकही शक्यता उरत नाही.

म्हणून मरणाचा विचार करण्यापेक्षा परिस्थितीशी लढण्याचा विचार करा.

जगणे म्हणजे प्रत्येक गोष्ट मनासारखी होणे नाही.

जगणे म्हणजे मनासारखे न झालेल्या गोष्टींवर मात करून पुढे जाणे!

हे स्पर्धेचे जग आहे. इथे यशाची वाट प्रत्येकाला तयार मिळत नाही; अनेकदा स्वतःची वाट स्वतःलाच तयार करावी लागते.

ज्याला अडचणी दिसतात तो थांबतो; पण ज्याला त्या अडचणींमध्ये संधी दिसते,तो पुढे जातो.डोंगर वाट अडवतो म्हणून डोंगराला घाबरायचे नसते. त्यावर चढायचे असते.वादळ आले म्हणून नौका सोडायची नसते. वल्हे घट्ट पकडायचे असते.

रस्ता बंद झाला म्हणून प्रवास संपत नाही. दुसरी वाट शोधायची असते.परिस्थिती ही आपली ओळख नसते; परिस्थितीशी आपण कसा सामना करतो, ही आपली खरी ओळख असते.

म्हणून मुलांनो, तुमच्या आई-वडिलांच्या कष्टांचा आदर करा. त्यांना तुमच्याकडून करोडो रुपयांची अपेक्षा नसेल; पण तुमच्या आयुष्याला अर्थ असावा, तुम्ही चांगले माणूस व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि त्यांनी केलेल्या कष्टांचे चीज व्हावे, एवढीच त्यांची अपेक्षा असते.

 

कधीतरी घरी शांतपणे बसा.

तुमच्या बापाच्या हातांकडे पाहा.

त्या हातांवरची घट्ट झालेली त्वचा पाहा.कष्टाने उमटलेल्या रेषा पाहा.

थकलेले डोळे पाहा.आणि मग स्वतःला विचारा

“माझ्यासाठी हा माणूस एवढा झिजतोय; मग मी माझ्या आयुष्यासाठी एवढेसे का लढू नये?”हा प्रश्न मनाला भिडला, तर कदाचित अनेक आयुष्ये वाचतील.

कारण आई-वडिलांनी मुलांना जन्म फक्त मोठे होण्यासाठी दिलेला नसतो; त्यांनी त्यांना आयुष्य जगण्यासाठी दिलेले असते.म्हणून आयुष्याला कमी लेखू नका.आयुष्य मरण्यासाठी नाही.आव्हाने स्वीकारण्यासाठी आहे.परिस्थितीसमोर झुकण्यासाठी नाही तिच्यावर मात करण्यासाठी आहे.स्वप्ने सोडण्यासाठी नाही ती पूर्ण करण्यासाठी आहे.

आज परिस्थिती प्रतिकूल असेल तर उद्याची पहाट तुमची असू शकते.आज हात रिकामे असतील तर उद्या तेच हात यशाची पताका उंचावू शकतात.फक्त थांबू नका.

लढा,शिका,कष्ट करा,पडला तर पुन्हा उठा,अपयश आले तर त्यातून शिका आणि मनात एक गोष्ट कायम जपा “माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी इतके कष्ट केले आहेत; आता माझे आयुष्य सुंदर करण्याची जबाबदारी माझी आहे.”

मुलांनो, मनासारखे झाले नाही म्हणून आयुष्य संपवू नका; मनासारखे आयुष्य घडवण्यासाठी स्वतःला घडवा.कारण मरण हा प्रश्नाचे उत्तर नाही; संघर्षातून मिळवलेले यश हेच खरे उत्तर आहे! आणि बापाच्या कष्टांना खरी सलामी म्हणजे त्याच्या जिवावर उधळपट्टी करणे नव्हे, तर

त्याच्या घामाचे चीज करणे,

त्याच्या स्वप्नांना आकार देणे

आणि एक दिवस त्याच्यासमोर अभिमानाने उभे राहून म्हणणे

“बाबा, तुम्ही माझ्यासाठी जे कष्ट केलेत,ते वाया जाऊ दिले नाहीत!”

बाप जेव्हा मुलाच्या पाठीवर हात ठेवून यशाची वाट दाखवतो.तेव्हा मुलाने पळायचं असतं.आणि जेव्हा मुलाची वेळ येते तेव्हा मुलाने बापाचा आधार होवून “बाबा मी आहे ना;”बस एव्हढ जरी म्हटले तरी बापाच्या कष्टाचे सार्थक झाले.म्हणून मुलाने शुल्लक कारणावरून बापला अंधारात ठेवून मरणाची वाट धरायची हे योग्य नाही.कारण मुलगा कसाही असला तरी त्याच्यासाठी बाप स्वतः जळतो आणि मुलांसाठी उजेड करतो.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा