प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे गट तयार करून जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट; पात्र लाभार्थी निवडीसाठी दुग्ध संस्थांनी पुढाकार घ्यावा – मनीष दळवी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या कार्यक्षेत्रात दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दुग्धव्यवसायासाठी प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून शेतकऱ्यांचा गट तयार करावा. अशा प्रकारे प्रत्येक गावात गट तयार झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. त्यासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ जिल्हा बँक निश्चितपणे देईल.
शेतकरी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी शासकीय यंत्रणांची मदत घेता आली असती; मात्र निवडलेले लाभार्थी प्रत्यक्षात दुग्धव्यवसायाशी जोडलेले असतीलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दुग्ध संस्थांशी संबंधित असलेल्या, दुग्धव्यवसायाचा अनुभव आणि आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जनावरांची योग्य काळजी घेऊ शकणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अनुभवाचा उपयोग करून योग्य लाभार्थ्यांची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही विचार सुरू आहे. शासनामार्फत सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनीही प्रत्येक दूध उत्पादकाला किमान वीस हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
दूध संकलनात वाढ करणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबतही जिल्हा बँक सकारात्मक विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
“बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे,” असे स्पष्ट करत दुग्ध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करावी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेला बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई तसेच विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी आणि दुग्धव्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
