कुडाळमध्ये भीषण अपघात; ट्रकला दुचाकीची मागून धडक, भूषण कुडाळकरांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील लेमनग्रास हॉटेलसमोरील घटना; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. बुधवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दुचाकीस्वार भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर लेमनग्रास हॉटेलसमोर एक ट्रक रस्त्यालगत उभा होता. याचदरम्यान कुडाळच्या दिशेने येणाऱ्या भूषण कुडाळकर यांच्या दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
