You are currently viewing वेंगुर्ल्यातील रस्त्यांवरील रंबलर्स तात्काळ हटवा; जय हनुमान मित्रमंडळाची मागणी
Oplus_16908288

वेंगुर्ल्यातील रस्त्यांवरील रंबलर्स तात्काळ हटवा; जय हनुमान मित्रमंडळाची मागणी

शहरातील पथदीप पूर्णवेळ सुरू ठेवण्याचीही मागणी

वेंगुर्ला : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी बसविण्यात आलेले रंबलर्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी ‘जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड’च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

वेंगुर्ला शहरातील शिरोडा नाका आणि दाभोली नाका ते वेंगुर्ला बंदर रोडवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, या रंबलर्समुळे लहान वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, सातत्याने बसणाऱ्या धक्क्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे रंबलर्स तात्काळ हटवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीवर प्रशासनाने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा, रंबलर्स न हटवल्यास आणि पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही मित्रमंडळाने दिला आहे.

याशिवाय, शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बसविण्यात आलेले पथदीप दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली. पथदीपांचा पूर्ण वेळ वापर झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले.

या वेळी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे, विकी गावडे, कृष्णा गावकर, अनूप गावडे, गोठ्या गावडे, सुमित गावडे, विकास कोरगावकर, गौरव गिरीप, दीपेश गावडे, रोशन गावडे, सतेज मयेकर, महेश गावकर, जगन्नाथ खवणेकर, गिरीश मांजरेकर, मंदार गावडे यांच्यासह मित्रमंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा