You are currently viewing विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घ्यावे : तहसिलदार शुभांगी कनवाडे

विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घ्यावे : तहसिलदार शुभांगी कनवाडे

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना नियमित अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी Beneficiary Satyapan App द्वारे डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र (Digital Life Certificate – DLC) ऑनलाईन पद्धतीने तयार करून घेणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र या ॲपद्वारे सत्यापित होणार नाही, असे लाभार्थी नोव्हेंबर २०२६ पासून योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे अद्याप हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून न घेतलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन संजय गांधी योजना सांगली शहरच्या तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनी सत्यापन ॲपव्दारे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घेणे आवश्यक आहे. हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करुन घेण्याकरिता सोबत आधार कार्ड, मोबाईल व बँक पासबुक घेऊन जवळील सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जावे.

ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करुन घेतले आहे, त्याच लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. सत्यापन ॲपवर हयातीचे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन न होणारे लाभार्थी हे माहे नोव्हेंबर 2026 पासून या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू शकतात.

ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे असे दाखले अद्यापही काढून घेतलेले नाहीत त्यांनी तात्काळ काढून घेण्याची दक्षता घ्यावी. जेणेकरुन लाभ मिळण्यास अडचण निर्माण होणार नाही. सांगली शहरातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित जिल्हाधिकारी कार्यालय संजय गांधी शाखा विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा व तालुक्याच्या लाभार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील तहसिल कार्यालस संजय गांधी योजना शाखा येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा