*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अक्षरांच्या पलीकडची भेट*
शब्दांच्या वाटेवर एक दिवस
अचानक तुझी चाहूल लागली
अक्षरांच्या पलीकडे जाऊन
मनाशी मनाची भेट झाली
न बोलताही कितीतरी
अर्थ डोळ्यांनी सांगितले
मौनाच्या त्या ओंजळीत
किती ऋतू अलगद दाटले
तुझ्या स्मिताच्या एका किरणाने
संध्येला चांदणं लाभलं
अंतरीच्या कोऱ्या पानावर
न बोललेलं काही उमटलं
ना प्रश्न उरला, ना उत्तर
ना शब्दांची कुठली आस
फक्त श्वासांमध्ये विरघळला
एक अनामिक सहवास
क्षण थांबला त्या भेटीपाशी
काळही झाला क्षणभर मुका
अक्षरांच्या पलीकडे उमटला
मनाचा एक सुंदर ठसा
आता शब्द लिहिताना जाणवतं
कविता कागदावर नसते
कधी एखाद्या भेटीतून जन्मते
आणि आयुष्यभर मनात वसते
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी—ठाणे@
9870451020
