You are currently viewing सांगलीत एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन

सांगलीत एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन

 दुष्काळावर मात करत एकरी १५० टन उत्पादनाचे उद्दिष्ट

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ (El Niño) सक्रिय झाल्यामुळे भारतासह महाराष्ट्राच्या हवामानावर, मान्सूनवर आणि तापमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे. निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाने पाण्याचा अपव्यय टाळून पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

याच पार्श्वभूमिवर कृषी विभागातर्फे सुजित हांडे पाटील यांच्या शेतात शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सांगली जिल्ह्यात ऊस हे प्रमुख नगदी पीक असून बहुतांश क्षेत्र पाटपाण्यावर असल्याने या पिकाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. यावर उपाय म्हणून AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा ऊस शेतीमध्ये प्रभावी वापर करून ‘एकरी १५० टन ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य फायलोचे व्यवस्थापक विशाल मिरजे उपस्थित होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “आधुनिक ऊस शेती लागवड तंत्रज्ञान आणि ठिबक सिंचनाचा वापर काळाची गरज आहे. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान आणि विविध सेन्सर्सच्या मदतीने जमिनीतील ओलावा व गरज ओळखून पाणी व खतांची मोठी बचत करता येते. योग्य वेळी, योग्य प्रमाणात खताची मात्रा देणे आता या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य झाले आहे. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीलाच ओळखून तो रोखता येतो, ज्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी सुधीर यादव, सहाय्यक कृषि अधिकारी दिलीप मिरेकर यांच्यासह परिसरातील प्रमुख शेतकरी प्रदीप पाटील, मोहन बोळाज, दिलीप बोळाज, अनिल शिंदे, अभिजीत शिंदे, शिवाजी चौगुले, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, सुजित पाटील, अंजुम महात आणि इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक कृषी अधिकारी अमित सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उप कृषी अधिकारी प्रदीप माळी यांनी मानले. एआय तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही शाश्वत शेती करण्याचा नवा मार्ग मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा