You are currently viewing व्रतस्थ व्यक्तिमत्व शंकरराव खारगे 

व्रतस्थ व्यक्तिमत्व शंकरराव खारगे 

 

महाराष्ट्रातील इचलकरंजी हे गाव म्हणजे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. कारण तिथे सर्वात जास्त सूतगिरण्या आहेत. महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे हे त्याच गावचे. एक कर्तव्यदक्ष कर्तव्य तत्पर व साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्त्वाचा तंतोतंत अवलंब करणारा सनदी अधिकारी म्हणून श्री विकास खारगे यांचा नावलौकिक आहे. यांचे वडील श्री शंकरराव खारगे यांचा श्री विकास खारगे यांचा त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.

श्री शंकरराव खारगे हे अध्यापक व्यवसायातील व्यक्तिमत्व. पण अध्यापनाबरोबरच त्यांनी सामाजिक साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने वाहून घेतले आहे. आज त्यांचे वय 97 आहे. पण याही वयात ते चांगले चालू शकतात. स्पष्टपणे फोनवर बोलू शकतात .मोटरसायकलवर बसू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे अखंड वाचन आजही सुरूच आहे.

 

मी जेव्हा जेव्हा इचलकरंजी ला गेलो तेव्हा तेव्हा श्री शंकरराव खारगे मला हे पुस्तक वाचतानाच दिसले. त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेऊन सुप्रसिद्ध लेखक श्री बापू तारदाळकर यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे बापूजी.

 

या पुस्तकामध्ये लेखकाने श्री शंकराव खारगे यांचा जीवनपट उलगडला आहे. अतिशय गरीब परिस्थिती मधून अध्यापन व्यवसायात काम करून या माणसाने आपल्या चिरंजीवांना म्हणजे श्री विकास खारगे यांना महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचविले आहे.

 

श्री शंकरराव खारगे यांना वाचनाचा छंद होता आहे व राहिलही. वाचनाचा परिणाम काय होतो याचा उत्तम उदाहरण म्हणजे खारगे परिवार. वडीलांचा वाचनाचा छंद विकास सरांबरोबरच इतरांनाही लागला आणि आज त्यांची सगळी मुले उच्च पदावर कार्यरत आहेत. याचे कारण फक्त वाचन वाचन आणि वाचनच आहे.

मराठी मध्ये एक म्हण आहे वाचेल तो वाचेल. या म्हणीचा खरा अर्थ शंकराव खारगे यांनी आपल्या जीवनामध्ये अवलंबिला आहे.

त्यांनी केलेल्या सामाजिक सांस्कृतिक व साहित्यिक व शैक्षणिक त्याची व त्यांच्या पुस्तकाची दखल घेऊन आम्ही त्यांना जीवनगौरव पुरस्कार घोषित केला.

 

हा जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा समारंभ आम्ही अमरावती मधील भव्य अशा सिकची रिसॉर्टमध्ये आयोजित केलेला होता. पण 97 वर्षाचे असल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. त्यांच्या हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र व महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे यांनी स्वीकारला

 

कार्यक्रमानंतर मी सन्मानपत्र स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ घेऊन सांगली जिल्ह्यातील इचलकरंजीला पोहोचलो. सोबत इस्लामपूरचे माझे मित्र श्री शिंदे हे होते. इचलकरंजीचे खारगे साहेबांचे घर म्हणजे अगदी साधेसुधे . त्यांच्या मूळ घराला अद्यापही कंपाऊंड नाही. हातमाग त्यांच्या दारातच आहे. जुन्या काळात चौकोनी घरी असतात त्याच स्वरूपाचे ते घर आहे. महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिवाचे हे घर आहे हे कोणाला सांगितले तर विश्वासच वाटणार नाही इतके ते घर साधे आहे.

 

मी गाडीतून उतरलो आणि खारगेसाहेबांच्या घराकडे जायला लागलो. नेहमीप्रमाणे श्री शंकरराव खारगे हे बाहेर व्हरांडयामध्ये खुर्ची टाकून बसले होते आणि त्यांच्या हातात होते ते पुस्तक. मी जवळ जात असताना नमस्कार केला. पुस्तक वाचनातून ते भानावर आले माझा नमस्कार त्यांनी स्वीकारला. मी यापूर्वी त्यांच्याकडे येऊन गेलो असल्यामुळे त्यांनी मला ओळखले आणि घराच्या आतमध्ये घेऊन गेले.

 

मी जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी इचलकरंजीला येणार आहे हे सर्व खारगे परिवाराला कळविले होते. खारगे परिवारालाही खूप आनंद झाला होता.त्यांनी एका हॉटेलमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता.श्री शंकराव खारगे यांना सगळे बापूजी या नावाने ओळखतात. आपल्या बापूजींचा सत्कार करायला 890 किलोमीटर वरून एक गृहस्थ अमरावतीवरून आलेले आहेत हे पाहून सर्वांनाच आनंद झाला.

 

सत्कार समारंभ आटोपला. सर्वांसोबत जेवण केले. मी निघते वेळी बापूजींचा निरोप घ्यायला लागलो तेव्हा बापूजी म्हणाले. काठोळे सर तुम्ही अजून मधून येत जा. तुम्ही आले की मला खूप छान वाटते. परवाही त्यांचा फोन येऊन गेला. या वयातही ते फोन करतात व सगळ्यात महत्त्वाचे फोनवरचे त्यांना ऐकू येते हे सर्वात महत्त्वाचे. माझ्याशी ते मनमोकळे बोलले. मनीषच्या विवाहा बद्दलही बोलले.

 

असा बापूजी नावाचा हा माणूस. आज इचलकरंजी मध्ये सर्वांचे आदरणीय असे व्यक्तिमत्व आहे. कित्येकांचे त्यांनी भले केलेले आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन केलेले आहे. आणि त्यामुळे आज पंचक्रोशी मध्ये त्यांचा बोलबाला आहे. वय 97 असले तरी तब्येत ठणठणीत आहे. ते स्वतः रस्त्याने एकटे चालू शकतात. मोटरसायकलवर बसू शकतात. स्वतःचे काम स्वतः करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचे पुस्तकांबरोबर माणसेही वाचण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. अशा या व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाला मिशन आय ए एस यांच्या वतीने मानाचा मुजरा .

 

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा