पिंगुळी उत्कर्ष नगरमध्ये महावितरणच्या जीर्ण विद्युत खांबाचा धोका; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
33 केव्ही लाईनचा खांब कोसळून नारळाच्या झाडाला अडकला; पूर्वसूचना देऊनही महावितरणचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप
पिंगुळी :
पिंगुळी येथील उत्कर्ष नगर परिसरात मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या महावितरणच्या 33 केव्ही विद्युत वाहिनीचे खांब जीर्ण होऊन धोकादायक बनले आहेत. याबाबत महावितरणला पूर्वकल्पना देण्यात आली होती. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित खांबांची पाहणीही केली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक कार्यवाही न झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री या विद्युत वाहिनीतील एक खांब खालून जीर्ण झाल्यामुळे कोसळून नारळाच्या झाडाला धोकादायक स्थितीत अडकला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या परिसरात घरगुती वीजपुरवठा करणारी लाईन असून, स्थानिक रहिवासी निलेश प्रभू यांचे घर आणि त्यांच्या वाहनविक्री व्यवसायातील वाहनेही याच परिसरात असतात.
या विद्युत वाहिनीतील आणखी दोन खांब आणि एक टॉवरदेखील धोकादायक स्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात बापू पिंगुळकर, घोलेकर, सुरेश प्रभू, वेतुरेकर आणि विलास भोसले यांची घरे आहेत. त्यामुळे जीर्ण खांब किंवा टॉवर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून धोकादायक खांब आणि टॉवरची दुरुस्ती अथवा आवश्यक बदल करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
