You are currently viewing शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सिंधुदुर्गातील आणखी ५८१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सिंधुदुर्गातील आणखी ५८१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी सिंधुदुर्गातील

आणखी ५८१ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध

सिंधुदुर्ग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची नवीन यादी दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी ५८१ शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ५ हजार ४०५ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी कळविले आहे.

            नवीन यादीतील ५८१ शेतकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांशी संबंधित ४८३ शेतकरी, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांशी संबंधित ९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाच्या https://firs.maharashtra.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहे.

            सदर यादी संबंधित विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांचे कार्यालय तसेच तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयांत उपलब्ध आहे. याशिवाय संबंधित विकास संस्था, बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालये आणि तलाठी कार्यालयांमध्येही याद्या प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे

            कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी यादीत नाव असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील कागदपत्रे सोबत न्यावीत :

१. आधार कार्ड,२. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी ३. कर्ज खात्याचे पासबुक व ४. बचत खात्याचे पासबुक

आधार प्रमाणीकरण पूर्णपणे विनामूल्य

            आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कोणत्याही केंद्रावर यासाठी शुल्क अदा करू नये. पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेच्या लाभासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा