फोंडाघाटमध्ये तुफानी पावसाने झोडपले; नदीवरील बंधाऱ्यांत पाणीसाठ्याची आशा
दीड तासाच्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा;
उकाड्यापासून दिलासा, मात्र सततच्या पावसाने बळीराजा चिंतेत आणि वीजपुरवठाही खंडित
फोंडाघाट :
फोंडाघाट परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाने नंतर जोर धरला. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच रस्त्यावरील धूळही कमी झाली आहे.
दरम्यान, पाणी अडविण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होण्याची आशा निर्माण झाली आहे. मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून दोन्ही नद्यांवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठल्यास परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला या पावसामुळे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा चिंतेत आहे. पावसाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता शेतकऱ्यांच्या मनात काळजी निर्माण झाली आहे. दुसरीकडे, परिसरातील वीजपुरवठा सुमारे दोन तासांपासून खंडित झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेती आणि वीजपुरवठ्याच्या समस्यांमुळे नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
