‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-२०२६’साठी ३० ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करा
पाच कोटी रुपयांची बक्षिसे; विजेत्यांना १० लाख रुपयांपर्यंत वर्क ऑर्डर व शासकीय स्तरावर संधी
सिंधुदुर्ग, दि. २३ (जिमाका) :
ग्रामीण व शहरी भागातील दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाधारित उपाय सुचविणाऱ्या युवकांसह विद्यार्थी, प्राध्यापक, स्टार्टअप, बचत गट आणि सामाजिक संस्थांसाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज-२०२६’ ही राज्यस्तरीय नाविन्यता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार असून, कोणतेही वयोमर्यादेचे बंधन किंवा नोंदणी शुल्क नाही, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रियंका कनके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परिसरातील दैनंदिन समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येतील, असे प्रभावी उपाय शोधणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
स्पर्धेसाठी कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नागरी विकास, आरोग्य, संरक्षण, शाश्वतता व ऊर्जा, पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी उदयोन्मुख तंत्रज्ञाने तसेच शिक्षण व रोजगारक्षमता अशी दहा प्रमुख क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सहभागींची नाविन्यपूर्ण कल्पना या क्षेत्रांपैकी एका क्षेत्राशी संबंधित असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेसाठी एकूण पाच कोटी रुपयांचे बक्षीस निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक क्षेत्रातून पाच याप्रमाणे एकूण ५० विजेत्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये एक महिला प्रवर्ग, एक १८ वर्षांखालील प्रवर्ग आणि तीन सर्वसाधारण प्रवर्गांतील विजेत्यांचा समावेश असेल. विजेत्यांना १० लाख रुपयांपर्यंतची वर्क ऑर्डर, पायलट प्रोजेक्ट राबविण्याची संधी, शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी तसेच इनक्युबेशनसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
इच्छुकांनी https://sevainnovationchallenge.in या अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक व ई-मेलद्वारे नोंदणी करून विहित नमुन्यात आपली नाविन्यपूर्ण कल्पना सादर करावी. वैयक्तिक सहभागासह शालेय विद्यार्थी, आयटीआय, पॉलिटेक्निक व पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक, स्टार्टअप, बचत गट आणि सामाजिक संस्थांनाही या स्पर्धेत सहभागी होता येईल.
सिंधुदुर्ग जिल्हा कृषिप्रधान असल्याने येथील युवकांना कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा आणि नागरी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत स्थानिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची मोठी संधी आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व विविध संस्थांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करून या स्पर्धेत सहभाग वाढवावा आणि महाराष्ट्राला जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रियंका कनके यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी :
- संकेतस्थळ : https://sevainnovationchallenge.in
- संपर्क क्रमांक : ०२३६२-२२८८३५
- ई-मेल : sindhudurgrojgar@gmail.com
- सोशल मीडिया : Sindhudurg Rojgar — Facebook, Instagram व WhatsApp Channels
