You are currently viewing मिरज येथील गणेश तलावात २५० श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न
Oplus_16908288

मिरज येथील गणेश तलावात २५० श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील शारदीय नवरात्रोत्सवानंतर श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन मिरज येथील गणेश तलावात उत्साहात व शांततेत पार पडले. दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी एकूण २५० श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन गणेश तलावात करण्यात आले.

सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कृष्णा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी असल्याने तसेच पर्यावरणाची हानी टाळणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे या उद्देशाने कृष्णा नदी अथवा पिण्याच्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन न करता गणेश तलाव, मिरज येथे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यासंदर्भात दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सर्व गणेश मंडळे व नवरात्रोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेश तलावाचा वापर करण्याचे आवाहन केले. मंडळांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने ४ क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या आकाराच्या ८० श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन क्रेनद्वारे, तर १७० मूर्तींचे विसर्जन तराफ्याद्वारे करण्यात आले. याशिवाय स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन यंत्रणा, विद्युत व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलीस प्रशासनानेही आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

पर्यावरणाचे संरक्षण, जलस्रोतांची स्वच्छता आणि सार्वजनिक सुरक्षितता यांना प्राधान्य देत मंडळांनी सहकार्य केल्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने सर्व दुर्गामाता मंडळे, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा