सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयूची दुरवस्था; साडेदहा लाखांच्या थकबाकीमुळे दुरुस्ती रखडली
एसी, यूपीएस बॅटरीसह अन्य यंत्रणांत बिघाड; जिल्हा शल्यचिकित्सकांकडे वैद्यकीय अधीक्षकांची कार्यवाहीची मागणी
सावंतवाडी :
येथील उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर अतिदक्षता विभागाचा (आयसीयू) वॉरंटी कालावधी संपला असून, देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक AMC/CMC करार झालेला नाही. कंपनीची सुमारे साडेदहा लाख रुपयांची अंतिम देय रक्कम प्रलंबित असल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामुळे आयसीयूतील विविध यंत्रणांच्या बिघाडाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे यांना पत्र पाठवून या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. Nidus कंपनीशी AMC/CMC करार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मॉड्युलर आयसीयूमध्ये कूलिंग यंत्रणा, यूपीएस बॅटरी, सक्शन मशीन आणि हँड जनरेटरशी संबंधित समस्या असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन इमारतीतील पहिल्या मजल्यावरील महिला आयसीयू विभागातील एसी कूलिंग यंत्रणाही गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने वाढत्या उष्णतेत महिला रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
दानशूरांच्या पंख्यांमुळे तात्पुरता दिलासा
महिला आयसीयूतील रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांच्या पुढाकारातून तीन वर्षांपूर्वी दानशूर व्यक्तींनी रुग्णालयाला दहा स्टँडिंग फॅन दिले होते. प्रफुल्ल सांगोडकर, राजू भालेकर आणि सुधीर ऊर्फ स्वामीनारायण पोकळे यांच्यासह दानशूरांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली होती. सध्या एसी बंद असल्याने या पंख्यांचा वापर पर्यायी व्यवस्था म्हणून केला जात आहे.
दरम्यान, संदीप कुडतरकर आणि जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र मसुरकर यांनी रुग्णालयाची पाहणी केली. आयसीयूतील कूलिंग यंत्रणा तातडीने पूर्ववत सुरू करावी आणि कंपनीसोबत देखभाल-दुरुस्तीचा करार करून अन्य बिघाड दूर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
