You are currently viewing देवगड–निपाणी महामार्गाच्या निकृष्ट कामावर संताप; फोंडाघाटमध्ये आंदोलनाचा इशारा

देवगड–निपाणी महामार्गाच्या निकृष्ट कामावर संताप; फोंडाघाटमध्ये आंदोलनाचा इशारा

देवगड–निपाणी महामार्गाच्या निकृष्ट कामावर संताप; फोंडाघाटमध्ये आंदोलनाचा इशारा

रस्त्यावर मोठमोठे खड्डे, ठेकेदाराला ग्रामपंचायतीसमोर बोलावण्याची मागणी; माजी सदस्य अजित नाडकर्णी यांचा इशारा

फोंडाघाट

फोंडाघाट परिसरातील देवगड–निपाणी महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. या निकृष्ट कामाबाबत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसेच संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायतीसमोर बोलावून जाब विचारावा, अशी मागणी फोंडाघाट ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजित नाडकर्णी यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी सरपंच संजना आग्रे आणि उपसरपंच संजय आग्रे यांचे लक्ष वेधले आहे. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी याच रस्त्यावरील खड्ड्यात वाहन घसरून गोसावी मॅडम यांचा अपघात झाल्याची आठवण करून देत, अद्यापही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नाडकर्णी यांनी केला.

देवगड–निपाणी मार्ग हा भविष्यात महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग ठरणार असून तीन राज्यांना जोडणारा हा रस्ता असल्याने त्याची दर्जेदार उभारणी होणे आवश्यक आहे. मात्र सध्याची अवस्था पाहता या मार्गाला ‘देवगड–हैदराबाद रोड’ अशी उपहासात्मक ओळख मिळण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून निकृष्ट कामाची चौकशी करण्यात यावी. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा