आयुक्त संजीता महापात्रा यांच्या हस्ते विधिवत पूजन व अग्निशमन विभागाकडे हस्तांतरण
सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या धोरणानुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या अग्निशमन सेवांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेसाठी शासनाकडून चार ‘फायर बुलेट’ वाहने प्राप्त झाली आहेत.
महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्रा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते या चारही वाहनांचे विधिवत पूजन करून अग्निशमन विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोनें, अग्निशमन विभागातील कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील अरुंद रस्ते, गल्लीबोळ तसेच वाहनांना सहज पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणी आग लागल्यास तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी फायर बुलेट वाहने उपयुक्त ठरणार आहेत. लहान स्वरूपाच्या आगी, विद्युत डीपी, दुचाकी, चारचाकी वाहने आणि ट्रान्सफॉर्मर येथे लागलेल्या आगींवर प्राथमिक स्तरावर नियंत्रण मिळविण्यासाठी या वाहनांचा वापर करता येणार आहे.
तसेच आपत्तीच्या प्रसंगी First Responder म्हणून घटनास्थळी त्वरित पोहोचून परिस्थितीचे प्राथमिक नियंत्रण करण्यासाठीही ही वाहने महत्त्वाची ठरणार आहेत.
फायर बुलेट वाहनांच्या उपलब्धतेमुळे शहरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये तसेच अरुंद मार्गांवर अग्निशमन विभागाला तातडीने पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आग लागल्याच्या घटनांमध्ये प्रारंभीच प्रतिसाद देणे आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या या वाहनांमुळे सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेच्या क्षमतेत भर पडणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन सेवेला अधिक बळकटी मिळणार आहे.
