प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून कृत्य; एलसीबी व कुडाळ पोलिसांच्या संयुक्त तपासाला यश
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे एकतर्फी प्रेमातून दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या साईल धुरी याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवघ्या पाच तासांत अटक केली. प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
वर्दे येथील खालची पालववाडी येथे राहणाऱ्या दामिनी पालव हिची १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली.
दामिनीच्या हत्येनंतर संशयित आरोपी घटनास्थळापासून घाईगडबडीत रस्त्यावर येऊन काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून निघून गेल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने पाहिले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. डिगस येथील दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयिताचे वर्णन आणि मोटारसायकलची माहिती समोर आली.
मोटारसायकलच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील पोचले आणि मीठ धुरीवाडा येथील साईल विश्राम धुरी याला ताब्यात घेतले. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्याला कुडाळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
प्राथमिक तपासात मृत दामिनी आणि आरोपी साईल यांची मागील दोन वर्षांपासून ओळख असल्याचे समोर आले आहे. साईल याचे दामिनीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने मागील वर्षभरापूर्वी दामिनीला प्रेमाची मागणी घातली होती; मात्र दामिनीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नसल्याच्या रागातून त्याने दामिनीची चाकूने भोसकून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू, मोटारसायकल, आरोपीच्या अंगावरील रक्ताचे डाग असलेले कपडे, घटनास्थळी घातलेले कपडे, मृत दामिनीचा मोबाइल आणि आरोपी साईलचा मोबाइल अशा महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या पुराव्यांच्या आधारे हत्येपूर्वीचा घटनाक्रम उलगडण्यास मदत होणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, एपीआय पाटील, पीएसआय हनुमंत भोसले, पीएसआय अनिल हाडळ, पीएसआय सावंत यांच्यासह एलसीबीच्या अंमलदारांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अवघ्या पाच तासांत संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.
