You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूची दुरवस्था; आठ दिवसांत एसी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूची दुरवस्था; आठ दिवसांत एसी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूची दुरवस्था; आठ दिवसांत एसी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

दोन महिन्यांपासून वातानुकूलन यंत्रणा बंद; रुग्णांच्या हालअपेष्टांबाबत रवी जाधव, रूपा मुद्राळे आक्रमक

सावंतवाडी :

येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची (आयसीयू) वातानुकूलन यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने तातडीने दखल घेऊन एसीसह आवश्यक सोयीसुविधा सुरू कराव्यात, अन्यथा आठ दिवसांत रुग्णांसह रुग्णालयाबाहेर आंदोलन करू, असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आणि रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.
आयसीयू पूर्णपणे बंदिस्त असल्याने एसी बंद असताना रुग्णांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या स्टँडिंग फॅनचा आधार घ्यावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. लाखो रुपये खर्च करून उभारलेली रुग्णवाहतुकीसाठीची लिफ्ट उद्घाटनानंतरही सेवेत सुरू झालेली नाही. तसेच रुग्णांना गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी पाठविण्याचे प्रमाणही कमी झालेले नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने संस्था आणि दात्यांच्या सहकार्याने आतापर्यंत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या रुग्णोपयोगी वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. रुग्णालयातील ड्रेनेजच्या समस्या, स्वच्छता आणि अन्य सुविधांसाठीही संस्थेने पुढाकार घेतला आहे. मात्र, रुग्णालयातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
आयसीयूची दुरवस्था नेमकी कशामुळे झाली, याची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. एसी यंत्रणेच्या दुरुस्तीचे बिल अदा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनाची नोटीस देण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी रुग्णालयाला भेट दिली. मात्र, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आणि रुग्णांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था-संघटनांना या दौऱ्याची पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याबद्दल रवी जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाने संबंधितांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा