एकतर्फी प्रेमातून दामिनीची हत्या; संशयित साईल धुरी पाच तासांत ताब्यात
सीसीटीव्ही फुटेज आणि मोटारसायकलच्या क्रमांकावरून पोलिसांनी लावला छडा; प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमाचा संशय
सिंधुदुर्ग
वर्दे येथील महाविद्यालयीन तरुणी दामिनी किरण पालव हिच्या खून प्रकरणाचा अवघ्या पाच तासांत छडा लावण्यात सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले. या प्रकरणातील संशयित साईल विश्राम धुरी याला वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथून मध्यरात्री १२ वाजता ताब्यात घेण्यात आले.
१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दामिनीची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर फरार झालेल्या संशयिताचा शोध घेताना प्रत्यक्षदर्शीने दिलेले वर्णन आणि डिगस येथील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचे ठरले. मोटारसायकलच्या क्रमांकावरून तपास करत पोलिसांनी संशयिताला मठ येथून ताब्यात घेतले.
एकतर्फी प्रेमातून हत्येचा संशय
प्राथमिक तपासानुसार, दामिनी आणि साईल यांची इन्स्टाग्रामवरून दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. साईलने प्रेम व्यक्त केले असता दामिनीने नकार दिल्याने रागातून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. हत्येत वापरलेला चाकू, मोटारसायकल, कपडे आणि दोघांचे मोबाईल यांसह महत्त्वाचे पुरावे तपासले जाणार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा पुढील तपास सुरू आहे.
