नेवासा / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार : आजच्या सद्य परिस्थितीमध्ये मोबाईल विद्यार्थ्यांना विविध पुस्तक वाचनापासून परावृत्त करित असून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी,’ असे आवाहन प्रा.डॉ. दिगंबर सोनवणे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य नेवासा तालुका शाखेच्या वतीने ” फिरते मोफत वाचनालय” उपक्रमांतर्गत मुळा एज्युकेशन सोसायटीच्या संत एकनाथ महाराज माध्यमिक विद्यालय, लोहोगाव , ता.नेवासा येथे शब्दगंध सामुहिक वाचन उपक्रम” प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी शिक्षक प्रल्हाद धाडगे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक अशोक सोनवणे यांनी केले . प्रा.डॉ. दिगंबर सोनवणे पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनो मोबाईल थोडा दूर ठेवा व पुस्तकांशी मैत्री करा . यामुळे तुम्हाला पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होईल व मोबाईल पासून तुम्ही परावृत्त व्हाल. शब्दगंध नेवासा तालुकाध्यक्ष प्रा.डॉ. किशोर धनवटे यांनी शब्दगंध चा हा सामाजिक जबाबदारीचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सांगितले. शब्दगंध नेवासा तालुका शाखेचे सल्लागार,कृषी शास्त्रज्ञ,डॉ.अशोक ढगे आपल्या भाषणात म्हणाले की, विविध पुस्तके हे संस्कारांचे काम करत असून मनात शुद्ध आचार व शुद्ध विचारांची पेरणी करण्याचे काम करतात,म्हणून विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्याची वाटचाल यशस्वी होण्यासाठी विविध पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.या प्रसंगी
लहोगाव चे ग्रामस्थ भास्कर जाधव ,बाळासाहेब बोरुडे , ज्ञानेश्वर कोरके, सुभाष ढेरे , मुरलीधर गाढे, सौ.मीरा गाढे , शाळेच्या सहशिक्षिका सौ.मिराबाई चोथे , सौ.पल्लवी निपुंगे , सह शिक्षक अशोक सोनवणे, विश्वनाथ शिंदे ,अमोल नवथर ,बापूसाहेब तांबे , सुरेश मोटे ,संतोष भुसारी,शिक्षकेतर कर्मचारी दशरथ मदणे,जनार्धन वाहुरवाघ, गणपत खंडागळे , दादासाहेब केदारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .
शेवटी शाळेचे मुख्याध्यापक संजय चिंधे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे एक तास आवडीचे पुस्तके स्वतः निवडून शाळेच्या प्रांगणात झाडाखाली बसून वाचनाचा आनंद घेतला. नेवासा तालुका शाखेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमा बद्दल शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी समाधान व्यक्त केले.
