You are currently viewing पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2026

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2026

निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी आज सांगली जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक श्री. देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे सावंत आदि उपस्थित होते.

शिक्षक मतदारांची संख्या मर्यादित असली तरी निवडणूक प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याबाबत तसेच निवडणूक विषयक प्रत्येक बाबीचे जबाबदारीने व गांभीर्याने सूक्ष्म नियोजन करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी डॉ. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रे, मनुष्यबळ, आचारसंहिता आदिंचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, आचारसंहिता, निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्रिका व मतपेटी व्यवस्थापन, स्वीप कार्यक्रम, मतदार यादी व्यवस्थापन, तक्रार निवारण कक्ष, वेबकास्टिंग, मतदान केंद्रावर नियुक्त मनुष्यबळाची सरमिसळ आदि बाबींचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दोन्ही निवडणुकीसाठी सांगली जिल्हा सज्ज असून, जिल्ह्यात निवडणूक अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथकांची स्थापना, मतदान पथके आदींचे प्रशिक्षण, मतदान केंद्रे, टपाली मतपत्रिका, मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या किमान आवश्यक सुविधा, मतदान प्रक्रिया, आचारसंहिता आदिंच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण व नियंत्रण कक्ष, स्वीपअंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम आदिंविषयी माहिती सादर केली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलीस विभागाच्यावतीने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, पोलीस मनुष्यबळाचे नियोजन आदिंची माहिती दिली.

सांगली, मिरजेतील मतदान केंद्रांना दिल्या भेटी

निवडणूक निरीक्षक डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी सांगली व मिरज येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. सांगली येथील म.के. आठवले विनयमंदिर, शांतिनिकेतन लोकविद्यापीठ तसेच मिरज येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय आणि पीएम श्री मिरज हायस्कूल येथील मतदान केंद्रांना भेट देऊन तयारी व सुविधांचा आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा