You are currently viewing पक्षाचे वजनदार पद नसताना जनसेवक म्हणून विशाल परब चर्चेत!

पक्षाचे वजनदार पद नसताना जनसेवक म्हणून विशाल परब चर्चेत!

विशाल परब विकासाचे ब्रँड; सिंधुदुर्गात वेगळी ओळख

प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज; नियोजनबद्ध सामाजिक उपक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकांचा बहर ओसरला आणि जनतेच्या सेवेसाठी चौवीस तास मैदानात म्हणणारे सर्वच पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी जनतेला, मतदारांना विसरून पुढच्या निवडणुकांची वाट पाहत सुशेगाद बसले असताना सावंतवाडी तालुक्यातील भाजपाचे युवा नेते विशाल परब मात्र राजकारण बाजूला सारून जनतेच्या सेवेसाठी वेळ काळ न पाहता समाजकार्यात व्यस्त झालेले पाहायला मिळतात. निवडणुका आल्या की, पावसाळ्यात अळंबी उगवतात तसे जनसेवेसाठी अनेक नेते, लोकप्रतिनिधी कार्यरत झालेले दिसतात पण, कुठल्याही निवडणुका नसताना जनतेच्या सेवेसाठी महाआरोग्य शिबिर, यावर्षी कमी पाऊस झाल्याने भविष्यात उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई कमी करण्यासाठी गावागावात श्रमदानाने वनराई बंधारे उभारणे, प्लास्टिक पिशव्यांचे वाटप करणे, मतदारसंघातील सुमारे ४० दिव्यांग बांधवांसाठी विशेष ‘देवदर्शन आनंद यात्रा’ आयोजित करणे, ग्रामीण भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात वाव मिळावा म्हणून स्थानिक खेळाडूंना आर्थिक व मानसिक पाठबळ देणे अशा विविध कामांच्या माध्यमातून विशाल परब घराघरात पोचले आहेत. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ला, दोडामार्ग सह इतर गावांमध्ये भाजपा पक्षाचे कोणतेही वजनदार पद नसताना जनसेवक म्हणून विशाल परब हे नाव चर्चेत आले आहे.

विशाल परब भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही मोठ्या पदावर कार्यरत नसूनही त्यांनी सुरू केलेला जनसेवेचा धडका सत्तेतील पद असलेल्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याला, कुठल्याही मतदारसंघात जमलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ते प्रतिवर्षी मतदारसंघात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवतात. यामध्ये कोकण संस्था आणि भाजप सिंधुदुर्गच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिरे व गरजू नागरिकांना मदत दिली जाते. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘अथायु हॉस्पिटल’च्या सहकार्याने त्यांनी मतदारसंघात भव्य आरोग्य तपासणी शिबिरांचे नियोजन केले आहे. त्यांचे हे अविरत सुरू असलेले जनसेवेचे कार्य पाहिले असता ते केवळ करायचं म्हणून केलेले काम नसून कामाची आखणी, योग्य नियोजन आणि काम पूर्णत्वास नेणे, सुफल सफल करणे यासाठी त्यांच्याकडे जवळपास ३०/४० प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता नियोजिलेले कार्य आपले काम म्हणून जबाबदारीने वावरताना दिसतो. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर विशाल परब जनसेवेची कामे लिलया पेलून नेतात. कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात त्यावेळी त्यांच्या नेत्याचे त्यासाठीचे योगदान महत्त्वाचे असते आणि नक्कीच आपले कार्यकर्ते राखण्यासाठी विशाल परब तेवढेच योगदान देत असतील यात शंकाच नाही.

राजकीय नेता म्हटलं की त्याच्याकडे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे उत्तम नेटवर्क असते. खास.नारायण राणे यांचा सुरुवातीचा काळ किंवा त्यांची कारकिर्द पाहिली असता, राणेंनी कार्यकर्ते घडविले. अशाचप्रकारे कार्यकर्त्यांची फौज घेऊन राणे काम करायचे. निवडणुकीला, सभेला जास्तीतजास्त माणसे गोळा करून आणण्याची कुवत असेल, नेत्याला निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून देत असेल त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्राधान्य दिले जायचे. तो मागेल तर त्याला किंवा तो सांगेल त्याला तिकीट आणि निवडून आल्यावर अध्यक्ष, सभापती आदी पदांसाठी त्याचा विचार व्हायचा. राणे शिवसेनेत असो की काँग्रेसमध्ये त्यांनी दिलेल्या लिफाफ्यातून नाव लिहून यायचं आणि त्यांच्याच आदेशानुसार ते जाहीर व्हायचं. परंतु, राणे भाजपमध्ये गेले आणि परिस्थिती बदलली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राणे समर्थक असे वेगवेगळे गट कार्यरत झाले. परंतु रवींद्र चव्हाण यांच्या मर्जीतील कार्यकर्ते असल्यामुळे विशाल परब यांचे वजन वाढले. वरिष्ठांच्या आशीर्वादाने असो किंवा इतर कुठल्याही अदृश्य शक्तीच्या जोरावर विशाल परब यांनी जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. किंबहुना राणेंचा उधळणारा, दौडणारा अश्व काहीसा रोखला गेला आणि विशाल परब विकासाचे ब्रँड म्हणून पुढे आले.

दीपक केसरकर यांच्याशी मतभेदानंतर राणे पर्व संपल्यात जमा झाले असे वाटत असतानाच भाजपने राणेंना लिफ्ट दिली आणि राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे राणेंनी उसळी घेतली नि खासदार, केंद्रीय मंत्री अशी मजल मारली. राणेंचा पुन्हा सिंधुदुर्गात दबदबा निर्माण झाला. राणे समर्थक म्हणून भाजपमध्ये देखील त्यांच्या कार्यकर्त्यांची वेगळी छाप राहिली. पण ज्या भाजपाने राणेंना यशाची चव चाखायला दिली तेच भाजप सिंधुदुर्गात राणेंच्या विरोधात विशाल परब यांना मोठे करत आहे अशी चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्गात भाजपचे एकमेव आमदार आणि मंत्री नितेश राणे आहेत परंतु, कोणत्याही नेत्याला लाजवेल असे काम सावंतवाडी मतदारसंघात विशाल परब यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांचे काम पाहता त्यांच्यावर रवींद्र चव्हाण यांचा वरदहस्त आहे असेही म्हणतील परंतु निवडणुका नसताना देखील अहोरात्र जनतेसाठी झटणे हे सुद्धा सहज सोपे काम नव्हे..!

विशाल परब यांच्या कामाकडे पाहून आता दुसरे तिसरे कोणीही तशी कामे करण्यासाठी पुढे येतील, कामेही करतील परंतु त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मात्र विशाल परब हेच ठरतील यात तिळमात्र शंका नाही…!!

प्रतिक्रिया व्यक्त करा