*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शशिकला गणपती गुंजाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सई*
चिंचा बोरं कैऱ्या खाऊ
चल गं सई शेतावर जाऊ।।ध्रु ।।
कवठाला लागला पाड गं
निळुंबीनं भरलं झाड गं
गजगे बिष्टल खेळाय घेऊ
चल गं सई शेतावर जाऊ ।।१।।
करटुली वेलाला लगडली
घ्यायला पोर झगडली
डहाळा हुरडा भाजून खाऊ
चल गं सई शतावर जाऊ ।।२।।
दोघी नको बाई साऱ्याजनी जाऊ
गाजर रताळ्याची मेजवानी जेवू
आवळा पेरू घेऊन येऊ
चल गं सई बिगी बिगी जाऊ ।।३।।
खडकात कडवंच डुलली गं
माळावर भोकर फुलली गं
शेव चिवडा नको बाई रान मेवा खाऊ
चल गं सई शेतावर जाऊ ।।४ ।।
चाटून बघ बाई मधाच्या थेंबा
खुळखुळ वाजतात बाभळीच्या शेंगा
डिंकाचा गोळा खिशात घेऊ
चल गं सई शेतावर जाऊ ।।५।।
सौ शशिकला गणपती गुंजाळ वांगी भुम धाराशिव
मो.९१३०२७२२१६
