You are currently viewing ‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

SIR प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली :

SIR (विशेष सखोल पुनरावृत्ती) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत कणकवली तालुका काँग्रेसच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
निवडणुका स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र, आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गेल्या काही काळात प्रश्न उपस्थित होत असल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे. SIR प्रक्रियेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याने हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचा संदर्भ देत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रातील मतदार यादीबाबत विविध आरोप करण्यात आले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला.
लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी कणकवली तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, अनिल डेगवेकर, महेश तेली, संजय राणे, राजेंद्र कदम, बाळू मिस्त्री, वि.खे. सावंत, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा