You are currently viewing एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘अर्थ-संगम ४.०’ अर्थशास्त्र महोत्सव उत्साहात संपन्न

एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘अर्थ-संगम ४.०’ अर्थशास्त्र महोत्सव उत्साहात संपन्न

मुंबई / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चर्चगेट येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थ-संगम ४.० – अर्थशास्त्र महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवातून विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची, आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची तसेच सर्जनशीलता आणि उद्योजकतेला चालना देण्याची संधी मिळाली.

विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. हेमलता के. बागला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय फड यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

यावेळी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे माजी प्रा. डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू तथा कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. महोत्सवाचे प्रायोजक कॅनरा बँकेच्या सहकार्याची विशेष व्हिडिओ सादरीकरणाद्वारे दखल घेण्यात आली.

या महोत्सवात पाच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘ग्लोबल फिस्कल डायलॉग’ या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी धोरणकर्ते आणि राजदूत यांच्या भूमिका साकारत आर्थिक विश्लेषण, धोरणनिर्मिती आणि वाटाघाटींचे कौशल्य प्रदर्शित केले. ‘इकोकॅनव्हास’ या स्पर्धेत अर्थशास्त्र आणि कलेचा संगम साधण्यात आला. या स्पर्धेत ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘वॉर ऑफ वर्ड्स’ या स्पर्धेत समकालीन आर्थिक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. यात १६ जोड्यांनी सहभाग घेतला, तर एकूण ३२ सादरीकरणे झाली.

‘मॉक शार्क टँक’ या स्पर्धेत ११ संघांमधील २४ विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कल्पना आणि उद्योजकीय कौशल्यांचे सादरीकरण केले. ‘मोनोॲक्ट’ स्पर्धेत पाच विद्यार्थ्यांनी विविध व्यक्तिमत्त्वे आणि सामाजिक विषयांवर आधारित एकपात्री सादरीकरणातून आपली कला सादर केली. विविध नामांकित संस्थांतील परीक्षकांनी स्पर्धांचे परीक्षण करून सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या महोत्सवात विविध स्पर्धेत एकूण १०७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

महोत्सवाच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सय्यद निखत यांनी केले. श्री. चंद्र मोहन जोशी यांनी समारोपपर भाषण केले. डॉ. निलेश सुरेश म्हात्रे यांनीही आपले आयोजनाबद्दल विचार मांडले. विद्यार्थ्यांनी आणि सहभागी स्पर्धकांनी महोत्सवातील अनुभव कथन केले. श्रीमती दियंका नस्कर यांनी कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय फड यांनी आभार प्रदर्शन करताना महोत्सवाच्या यशस्वितेसाठी योगदान देणारे मुख्य आयोजन समितीचे सदस्य, विद्यार्थी स्वयंसेवक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.

‘अर्थ-संगम ४.०’ हा केवळ स्पर्धात्मक महोत्सव न राहता विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, प्रभावी संवाद, नाविन्यपूर्ण कल्पना आणि व्यावहारिक ज्ञान विकसित करणारा उपक्रम ठरला. वर्गातील अर्थशास्त्रीय संकल्पना प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याची संधी या महोत्सवातून विद्यार्थ्यांना मिळाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा