You are currently viewing माळून काजव्यांना..

माळून काजव्यांना..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माळून काजव्यांना…*

 

चांदोबा गोल गोल किती छान भासतो हा

निळाईत बुडून गेला अमृत ओततो हा

उतरून ढग आले पाहताच त्या भुलावे

माळून काजव्यांना हे चांदणे सुखावे..

 

वृक्षास लगडूनी चमचमती काजवे ते

आरास दिव्य भासे जणू रत्ने भासती ते

गारूड करुनी तो विश्वची मग झुलावे

माळून काजव्यांना हे चांदणे सुखावे..

 

हा डोह निळाईचा वर्णावे कैसे त्याते

चांदण्यात न्हातो चंद्र अन् काजव्यांशी नाते

लयलूट सुंदर ती मन कैसे न डुलावे

माळून काजव्यांना हे चांदणे सुखावे..

 

शब्दात मावतो ना हा चंद्र चांदण्या त्या

मन भावगीत होते राईत अडकते त्या

विसरूनी भव सारा वाटते तिथे रहावे

माळून काजव्यांना हे चांदणे सुखावे…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा