देवस्थानच्या वतीने डॉ. अपुर्वा बासुर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार
वेंगुर्ले / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी आरवली येथील श्री देव वेतोबा देवस्थानचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी त्यांचे स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. अपूर्वा बासुर यांनी श्री देव वेतोबाचे दर्शन घेतले.
श्री देव वेतोबा देवस्थानची महती जाणून घेतल्यानंतर डॉ. अपूर्वा बासुर यांनी श्री देव वेतोबाच्या दर्शनाने प्रसन्न झाल्याचे सांगितले. तसेच श्री देव वेतोबा देवस्थान हे तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
श्री देव वेतोबा देवस्थानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कामांची सविस्तर माहिती अध्यक्ष श्री. जयवंत राय यांनी डॉ. अपूर्वा बासुर यांना दिली. देवस्थान समितीच्या या सामाजिक कामाबद्दल त्यांनी कौतुक केले. तसेच ‘ब’ वर्गातील उर्वरित कामाबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थान समितीचे सचिव श्री. आबा टांककर, डॉ. शैलेन्द्र नाईक, पोलिस पाटील श्री. मधुसूदन मेस्त्री, आरवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. केतन जाधव, लिपिक श्री. बाबू सावंत, श्री. रमण शेलटे आदी उपस्थित होते.
