जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
१५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, चित्रकला व पथनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार
सिंधुदुर्ग :
क्रीडा विभागाच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय युवा महोत्सव समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन नोव्हेंबर २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव २०२६-२७ साठी ‘सांस्कृतिक व विकसित भारत युवा नेतृत्व संवाद’ (Cultural Track and Viksit Bharat Young Leaders Dialogues Track) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, कवितालेखन, चित्रकला आणि पथनाट्य या स्पर्धांचा समावेश आहे. लोकनृत्य व लोकगीत स्पर्धेसाठी प्रत्येकी १० सहभागी व साथसंगत स्वतंत्र, तर पथनाट्यासाठी १० सहभागी असतील. कवितालेखन व चित्रकला या वैयक्तिक स्पर्धा आहेत.
जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. इच्छुक युवक-युवती, युवा मंडळे, महिला मंडळे तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थी, कृषी, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी व संघांनी सहभागी व्हावे.
सहभागासाठी दि. १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणीसाठी https://forms.gle/YD8E7f2xXJ2WkTrG6 या गुगल लिंकचा वापर करावा. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची सविस्तर नियमावली याच गुगल लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती व युवा संघांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
