*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*न्याहरी*
ती गरमागरम न्याहरी
त्याच्या हातात ठेवायची,
दारात उभी राहून
त्याला शेतात जाताना बघायची.
तोही तिने केलेली गरमागरम न्याहरी
डोक्यावर घेऊन आनंदात जायचा,
त्याच्या कष्टाच्या घामाने
सुकलेल्या मातीला जिवंत ठेवायचा.
संध्याकाळी त्याला येताना पाहून
ती बादलीभर गरम पाणी
ओट्यावर आणून ठेवायची.
हातपाय धुतल्यानंतर
तिने बनवलेल्या मसालेदार
चहाची फुर्की मारायची.
त्याने केलेल्या कष्टांचा थकवा
ती त्याच्या चेहऱ्यावर बघायची.
भाकरी थापत थापत
दिवसभराच्या घडामोडी ती
आस्थेने विचारायची.
तोही तिला
खळ्यामळ्यातल्या गप्पा
पोटतिडकीने सांगायचा.
तिचा उत्साह, तिचा आनंद,
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य
डोळ्यांत भरून घ्यायचा.
चेहऱ्यावरचा आनंद
पदराला बांधून ती,
टरटर फुगलेली गरमागरम भाकर
ताटात टाकायची.
किर्र अंधारात, चांदण्यांच्या उजेडात
मांडीला मांडी लावून
त्याच्यासोबत जेवायला बसायची.
खुडा-भाकरीच्या जेवणातही
त्यांना लयीत सुख वाटायचे.
एकमेकांची काळजी घेताना
एकमेकांचं दुःख वाटून घ्यायचे.
हिरवी हिरवी शेतं, बहरलेली पिकं
त्याच्या बोलण्यातून बघायची.
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून
ओलावलेल्या मातीचा सुगंध
ती घरबसल्या घ्यायची.
त्यांचं असंच रोजचं जगणं
ती रोज पाहत असे.
तो येण्याची वाट बघत
संध्याकाळी त्याच्यासाठी
ओट्यावर येऊन बसे.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
