You are currently viewing लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांचे राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांचे राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांचे राष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश

ग्वाल्हेरच्या एनसीसी रिफ्रेशर कोर्समध्ये सुनेत्रा ढेरे देशात प्रथम
५८ महाराष्ट्र बटालियनच्या लेफ्टनंटला ‘कमांडंट गोल्ड मेडल’; देवगड महाविद्यालयासह सिंधुदुर्गचा गौरव

देवगड :

एन.सी.सी. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, ग्वाल्हेर येथे झालेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या अधिकारी लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी देशभरातील अधिकाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘कमांडंट गोल्ड मेडल’ प्रदान करण्यात आले. सध्या त्या देवगड महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
हा रिफ्रेशर कोर्स ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. देशभरातून तब्बल ११७ एनसीसी अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. आपत्ती व्यवस्थापन, मॅप रीडिंग, रायफल ड्रिल यांसह विविध विषयांचे प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिके या कोर्समध्ये घेण्यात आली.
लेफ्टनंट सुनेत्रा ढेरे यांनी एकूण गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवतानाच रायफल शूटिंग, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आपली अष्टपैलू गुणवत्ता सिद्ध केली.
एनसीसी अधिकारी होण्यासाठी त्यांनी २०२० मध्ये ग्वाल्हेर येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. त्यानंतर पूर्व कमिशन प्रमाणपत्र मिळवत त्यांनी आर्मीमध्ये लेफ्टनंट रँक प्राप्त केली. रिफ्रेशर कोर्समधील या यशानंतर नजीकच्या काळात त्यांना कॅप्टन रँक प्रदान करण्यात येणार आहे.
त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे देवगड महाविद्यालयासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या यशाबद्दल ५८ महाराष्ट्र एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, संस्था पदाधिकारी, देवगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा