कैद्यांना कायदेशीर हक्क व अधिकारांची माहिती
जिल्हा कारागृहात विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्हा कारागृह वर्ग-१, येथे कैद्यांचे हक्क व अधिकार, प्ली बार्गेनिंग तसेच जामिनाच्या तरतुदी या विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, मुख्य लोक अभिरक्षक ॲड. आर. एच. वागज, ॲड. एस. एस. खुने, जिल्हा कारागृह वर्ग-१ चे अधीक्षक एस. यु. कांबळे तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम. एम. कन्नेवाड उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी कैद्यांना त्यांच्या कायदेशीर हक्क व अधिकारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षा झाल्यानंतरही प्रत्येक कैद्याचे मानव म्हणून असलेले मूलभूत हक्क अबाधित राहतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कारागृह व्यवस्थेचा उद्देश केवळ शिक्षा देणे नसून कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी होण्यासाठी सक्षम करणे हा देखील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य लोक अभिरक्षक ॲड. आर. एच. वागज यांनी जामिनाच्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती दिली. गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या व्यक्तीला न्यायालयाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून तात्पुरते मुक्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया म्हणजे जामीन होय, असे त्यांनी स्पष्ट केले. जामीन देताना न्यायालयाकडून प्रकरणाचे स्वरूप, आरोपांची गंभीरता आणि लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींचा विचार केला जातो. जामीनपात्र गुन्ह्यामध्ये कायद्यानुसार जामीन मिळणे हा आरोपीचा अधिकार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ॲड. एस. एस. खुने यांनी प्ली बार्गेनिंगच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. कायद्यातील तरतुदींनुसार प्ली बार्गेनिंगच्या माध्यमातून आरोपीला प्रकरणाचा जलद निपटारा करण्याची संधी मिळते. त्यामुळे न्यायालयीन वेळ व खर्चाची बचत होऊन प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांसोबतच जामीन आणि प्ली बार्गेनिंग यांसारख्या उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांची माहिती मिळाली. कायद्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या हक्कांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम. एम. कन्नेवाड यांनी केले.
