*शिक्षक दिन उत्साहात साजरा; ‘AI in Commerce’ अभ्यासक्रम प्रमाणपत्रांचे वितरण*
मालवण :
कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभाग, कॉमर्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अंबिका कॉम्प्युटर्स, मालवण यांच्या सहकार्याने शिक्षक दिन आणि ‘AI in Commerce’ अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभुझांट्ये सभागृहात आयोजित या कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांचे मनोगत, मार्गदर्शनपर भाषणे आणि प्रमाणपत्र वितरण अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अकाउंटन्सी अँड कॉमर्स विभागप्रमुख तसेच NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे वाणिज्य क्षेत्रातील महत्त्वाचे साधन बनले असून विद्यार्थी या नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे राहू नयेत, या उद्देशाने विभागाच्या वतीने ‘AI in Commerce’ या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाचा FYBCOM, SYBCOM आणि TYBCOM मधील एकूण १०५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून विद्यार्थ्यांना AI संदर्भात प्रत्यक्ष Hands-on Training देण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
१० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन असल्याने डॉ. नाईक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सामाजिक आणि मानसिक संवेदनशीलतेचा संदेश दिला. समाजातील मानसिक ताणतणाव, एकटेपणा, नैराश्य आणि संवादाचा अभाव यांसारख्या बाबींकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे, असे नमूद करून विद्यार्थ्यांनी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबाबत सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात जाणवणारा बदल, तिचा एकटेपणा किंवा मानसिक अस्वस्थता याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि आवश्यकतेनुसार योग्य मदतीकडे त्यांना मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपला साधा संवाद, शांतपणे ऐकून घेणे आणि दिलेला आधार एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो, असा संवेदनशील संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबाते यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंबिका कॉम्प्युटर्स, मालवणचे श्री. विद्याधर केनवडेकर व सौ. अंजली केनवडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी NSS स्वयंसेवकांच्या वतीने महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर ‘AI in Commerce’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सानिया चव्हाण, प्राची गावडे, हर्षदा कांबळी, दुर्वा चव्हाण, मानसी घाडीगावकर आणि अथर्व कुपकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. AI अभ्यासक्रमामुळे मिळालेला प्रत्यक्ष अनुभव, त्याचा वाणिज्य शिक्षणात होणारा उपयोग आणि भविष्यातील करिअरसाठी त्याचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. शिक्षकांनी केवळ विषयाचे ज्ञान न देता जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आजचा समारंभ केवळ प्रमाणपत्र वितरणाचा नसून, सिंधुदुर्ग महाविद्यालयाने काळाची पावले ओळखून भविष्यातील गरजा लक्षात घेत ‘AI in Commerce’ अभ्यासक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला, त्याचा हा गौरव सोहळा असल्याचे प्रतिपादन अंबिका कॉम्प्युटर्सचे श्री. विद्याधर केनवडेकर यांनी केले.
वाणिज्य क्षेत्रातील AI चे वाढते महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाणिज्यविषयक ज्ञानासोबत आधुनिक तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले. बँकिंग, विमा, सेवा, उत्पादन यांसह विविध क्षेत्रांमध्ये AI चा प्रभावी वापर होत असून त्यातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, असे त्यांनी सांगितले.
AI चा वापर व्यवसायातील समस्या सोडविणे, निर्णयक्षमता वाढविणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी करता येतो. मात्र, AI चा वापर करत असतानाही विषयाचे मूलभूत ज्ञान आत्मसात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला हा अभ्यासक्रम त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर ‘AI in Commerce’ अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. विद्याधर केनवडेकर, सौ. अंजली केनवडेकर, प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबाते, स्टाफ सेक्रेटरी डॉ. देविदास हारगिले, NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. संकेत बेळेकर, IQAC समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, विभागप्रमुख डॉ. सुमेधा नाईक आणि प्रा. रामचंद्र तावडे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. कैलास राबाते यांनी शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन करताना शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा सकारात्मक उपयोग करून आपल्या भविष्यातील वाटचालीला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘AI in Commerce’ अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध साधनांचा वाणिज्य व लेखाशास्त्र क्षेत्रात व्यावहारिक उपयोग करण्याची संधी मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता सावंत यांनी प्रभावीपणे केले, तर प्रा. रामचंद्र तावडे यांनी आभार प्रदर्शन केले.
शिक्षकांचा सन्मान, आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्यविकास आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश यांचा सुंदर संगम घडविणारा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरला. ‘AI in Commerce’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील वाणिज्य क्षेत्रासाठी सक्षम करण्याबरोबरच, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबाबत सजग राहून संवाद आणि माणुसकी जपण्याचा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास डॉ. हंबीरराव चौगले, डॉ. मल्लेश खोत, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. मंदार मुंडले, प्रा. सुदेष्णा सारंग, प्रा. अनघा टिकले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, वाणिज्य विभागातील विद्यार्थी आणि NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. रामचंद्र तावडे, प्रा. योगिता सावंत, डॉ. संकेत बेळेकर, प्रा. अनघा टिकले, कॉमर्स विभागातील विद्यार्थी आणि NSS स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
