सह्याद्रीच्या दुर्गम भागातील घारपीच्या लेकींची फुगडी ठरतेय लक्षवेधी!
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पारंपरिक लोककलेचा जागर; गावासह आजूबाजूच्या परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा
सह्याद्रीच्या दुर्गम भागात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीच्या मंगलमय वातावरणात सादर केलेली पारंपरिक फुगडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुंदर संगम या फुगडी नृत्यातून अनुभवायला मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेत विविध आनंददायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत फुगडीचे मनमोहक सादरीकरण केले. तालबद्ध टाळ्या, एकसंध फेर, लयबद्ध हालचाली आणि विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील उत्साहामुळे या सादरीकरणाला विशेष रंगत आली.
घारपी गावासह आजूबाजूच्या गावांमधील परिसरातूनही या फुगडी नृत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करत अनेकांकडून त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रोत्साहनातून आतापर्यंत जवळपास २० हजार रुपयांची रक्कम विद्यार्थिनींना मिळाली असून, त्यांच्या कलाविष्काराला मिळणारी ही दाद त्यांचा उत्साह वाढवणारी ठरत आहे.
या फुगडीच्या तयारीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन विद्यार्थिनींना लाभत आहे. फुगडीतील ताल, फेर, हालचाली आणि सादरीकरणातील बारकावे समजावून देत माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.
या फुगडी नृत्यात यशस्वी सावंत, वैष्णवी गावडे, इशिका असनोडकर, रुची नाईक, किशोरी गावकर, साक्षी गावकर, श्रुती सावंत, नयना गावडे, गौतमी गावडे आणि जान्हवी नाईक या विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत.
अशा उपक्रमांमधून विद्यार्थिनींना केवळ कला सादरीकरणाची संधी मिळत नाही, तर सांघिक भावना, शिस्त, आत्मविश्वास, सहकार्य आणि आपल्या लोकपरंपरेविषयी अभिमान यांचीही जडणघडण होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक लोककलेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा हा उपक्रम विशेष ठरत आहे.
सह्याद्रीच्या कुशीतून उमटलेला फुगडीचा हा पारंपरिक ताल आता गावाच्या सीमा ओलांडून परिसरातील नागरिकांच्या मनापर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थिनींच्या कलाविष्काराला मिळणारा प्रतिसाद आणि प्रोत्साहनाची वाढती रक्कम त्यांच्या कलेला मिळालेली कौतुकाची पावती ठरत आहे.
या उपक्रमाला मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे तसेच अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर आणि संचिता सावंत शाळा व्यवस्थापन समिती व पालक माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांचे सहकार्य व मार्गदर्शनही लाभत आहे.
