एका तत्त्वनिष्ठ युनियन लीडरचा संघर्षमय, वास्तववादी प्रवास ! (लीडर कादंबरी)
साहित्य वाचन विश्वात सध्या प्रचंड गाजत असलेली डॉ. अशोक भाईडकर यांनी लिहिलेली ‘लीडर’ ही कादंबरी कामगार चळवळीच्या काळ्या पडद्यावरचा जिवंत धगधगता इतिहास आहे. सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘डिंपल प्रकाशन’ संस्थेने ‘लीडर’ कादंबरी प्रकाशित केली आहे. या कादंबरीच्या मागील पृष्ठावर डॉ. अलका आगरकर-रानडे यांनी ठळक शब्दात सांगितल्या प्रमाणे, ही कहाणी म्हणजे मेहनतीने मिळवलेल्या उच्च अधिकार पदाला रामराम ठोकून, केवळ कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लष्करी भाकऱ्या भाजत जगलेल्या एका प्रामाणिक युनियन लीडरचा हा एक शब्दांकित दस्तऐवज आहे. ‘पेट्रोलियम हाऊस’ मुंबई मधील कॉर्पोरेट वातावरणातून सुरू होणारा हा प्रवास वाचकांना कादंबरीच्या एका एका पानात खिळवून ठेवतो. सुरुवातीला इंग्रजीची भीती बाळगणारा आणि मुंबईच्या बड्या, बलाढ्य चकचकीत वातावरणात बावरलेला नायक हा पुढे जाऊन ज्यावेळी कामगार चळवळीचा आत्मा होऊन केंद्रस्थानी येतो, त्यावेळी एका खऱ्या मनस्वी नेत्याचा जन्म होतो. खेतन भवनची ऑल इंडिया मीटिंग आणि डॉ. दत्ता सामंत, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या तत्कालीन जहाल व आक्रमक नेत्यांच्या नेतृत्वाची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे परंतु, हा प्रवास केवळ यशाचा नाही तर तो एका काटेरी मुकुटासारखा आहे. कादंबरीतील विविधांगी प्रकरणांमधून युनियनच्या राजकारणाची अंतर्गत हेव्यादाव्यांची, ईर्ष्यांची गद्दारीची आणि फसवणूक ढोंगीपणाची अत्यंत क्लेशदायक वास्तव गाथा लेखकाने मांडलेली आहे. “काम सरो नी वैद्य मरो” या वृत्तीत जगणाऱ्या लोकांचा अनुभव घेत, स्वतःचे हक्काचे घर नसतानाही, सर्वांगीण शिक्षण आणि विद्वत्ता असतानाही स्वतःला युनियनच्या कार्यात झोकून देणाऱ्या एका सच्च्या कार्यकर्त्याची भावनिक घुसमट या कादंबरीत आपल्याला पाहायला मिळते. इतकेच नव्हे तर, आजच्या काळातील कंत्राटी पद्धत, ‘हायर अँड फायर सिस्टीम’ तथा बदललेल्या सरकारी धोरणांने युनियनचे अस्तित्व कसे धोक्यात आले आहे, यावरही लेखकाने अतिशय अंतर्मुख करणारे भाष्य केले आहे.
कादंबरीच्या शब्दचित्रणात झालेला ‘जीवघेणा हल्ला’ हा प्रसंग कामगार युनियनमधील वाढती स्पर्धा, हेवेदावे या सर्वातून येणाऱ्या अमानवी हिंसा ह्या प्रखर तीव्रतेवर लेखक प्रकाश टाकंताना दिसतो. पी.ई.यू. (PEU) आणि एच.पी.के.यू. (HPKU) या दोन बलाढ्य युनियनमधील संघर्ष केवळ वैचारिक न राहता तो थेट वैयक्तिक पातळीवर उतरून हल्ल्यांपर्यंत कसा पोहोचतो, याचे अत्यंत थरारक वास्तववादी वर्णन लेखकाने केले आहे. ‘पेट्रोलियम हाऊस’ मुख्यालयासमोर निष्पाप कामगार नेते कृष्णन यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यांचे दुःखद निधन हे वाचकांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. युनियनमधील निष्ठावंत सदस्यांना धमकावणे आणि बळाचा वापर करून स्वतःचे वर्चस्व टिकवणे ही नेत्यांची धडपड कामगार चळवळीच्या काळ्या बरबटलेल्या बाजूचे अत्यंत प्रामाणिक दर्शन लेखकाच्या लेखणीतून घडवलेले आहे. कादंबरीतील राजू शेट्टीचा बिल पास करण्याचा प्रसंग एका प्रामाणिक, स्वाभिमानी कामगाराच्या मानसिकतेचा आरसा आहे. खोटी, फसवी बिले दाखवून युनियनचे पैसे उकळल्याचा खोडसाळ आरोप ज्यावेळी मुख्य पात्रावर होतो, त्यावेळी मुख्य पात्रांच्या प्रामाणिक स्वभावाचा उद्रेक सहनशीलतेच्या पलीकडे जातो स्वतःची कोणतीही चूक नसताना केवळ अंतर्गत राजकारणातून आणि ज्येष्ठ नेत्यांच्या असत्यवादी मौनाने एका निष्कलंक कामगाराला ‘गुंड लीडर’ म्हणून हे जग सोसावे लागते, हा प्रसंग आपल्या समाज व्यवस्थेतील त्रुटीं दर्शवतो. आयुष्या भराची पुंजी कामगारांसाठी खर्च करूनही शेवटी पदरी पडलेली उपेक्षा आणि ‘गुंड लीडर’ अशी लागलेली ठप्पकी ओळख, नायकाच्या मनातील वैराग्य आणि वेदना वाचकांपर्यंत थेट पोहोचवण्यात लेखकाला पूर्ण यश मिळालेले आहे.
या प्रामाणिक कथा पात्राने राजीनामा दिल्यानंतर व वैयक्तिक आयुष्यात प्रेयसीने साथ सोडल्या नंतरच्या पडत्या काळात देखील नायक हार न मानता पुन्हा एकदा जोमाने कसा उभा राहतो, हे कादंबरीचे मुख्य बलस्थान आहे. अवघ्या आठ कामगारांना सोबत घेऊन संपूर्ण भारतील आलेल्या शेकडो कामगारांच्या बळावर हा नायक शून्यातून परत विश्व निर्माण करतो. आपली ‘स्वतंत्र युनियन’ स्थापन करण्याचा त्याचा निर्णय वाचकाला थक्क करणारा आहे. नव्या युनियनला मान्यता मिळवण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर धडपड, ती धडपड करताना इतर मोठ्या युनियनकडून मिळणाऱ्या धमक्या आणि ऐनवेळी दिल्लीतून आलेल्या डी.सी. लहरी व वा.य.डी शर्मा सारख्या दिग्गज नेत्यांशी आलेला संबंध, यामुळे कथेला एक वेगळी गती प्रप्त झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत आपले स्वतः चे अस्तित्व निर्माण करणाऱ्या एका खऱ्या प्रामाणिक ‘लीडर’ची ही यशोगाथा वाचकांना प्रेरणा देऊन जाते.
ही एक केवळ काल्पनिक कादंबरी नाही तर ती अरबिंदो बोस, कॉ. वाय. डी. शर्मा, राजाभाऊ कुलकर्णी आणि समरबाबू चक्रवर्ती यांसारख्या महान कामगार नेत्यांच्या त्यागाला आणि लढ्याला आदरांजली वाहणारी ऐतिहासिक दस्तऐवजाची एक प्रभावी ग्रंथ भेट आहे. कामगार चळवळी करता आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या या खऱ्या नेत्यांच्या स्मृतीला ही कथा सादर अर्पण करून लेखकाने कामगार विश्वातील संघर्षमय निष्ठेला सर्वांसमोर ठेवून समाजाला प्रेरणादायी विचार दिला आहे. त्यातूनच या ‘लीडर’ कादंबरीचा उत्कृष्ट आशादायी समारोप केला आहे.
“मोडेन पण वाकणार नाही” ही उक्ती अंगी बाळगुन लढणाऱ्या या लीडर लोकाचा प्रवास शेवटी ‘कालाय तस्मै नमः’ म्हणत एका पराभूत पण स्वाभिमानी नेत्याच्या भूमिकेतून समोर येतो. ही कादंबरी फक्त वैचारिक झाली नाही तर ती कलात्मकदृष्ट्याही उत्कृष्ट झाली आहे. सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांनी चितारलेल्या आकर्षक मुखपृष्ठमुळे पाहताच क्षणी या कादंबरीकडे वाचक आकर्षित होतात. कादंबरीवरील या चित्रणामुळे
कादंबरीचे गांभीर्य वाचकांना समजून येते तर कादंबरीतील आतील रेखा चित्रण मी केले आहे. ही माझी रेखाचित्रे अतिशय प्रासंगिक आहेत. असे वाचकांनी अनेकदा प्रतिक्रियेतून सांगितले आहे. आजच्या तरुण पिढीला
दिशादर्शक असलेली ही कामगार विश्वातली महत्वपूर्ण कादंबरी आहे. आपण सर्वांनी ती वाचावी
प्रकाशन : डिंपल पब्लिकेशन
कादंबरी : लीडर
लेखक : डॉ. अशोक भाईडकर
मूल्य रु. : 200 ₹
संपर्क. : 9833208453
बुक शॉप आणि ऑनलाइन वर हे पुस्तक उपलब्ध आहे.
लेखिका श्रुती रसाळ
