मंगेश पाडगावकरांच्या उभादांडा गावाला साहित्य पर्यटनाचे नवे रूप देणार
दोन महिन्यांत ‘कवितांचे गाव’ दिमाखदार करण्याचे मंत्री उदय सामंत यांचे निर्देश
सिंधुदुर्ग,
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक स्मृतींशी जोडलेल्या उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ उपक्रमाला नावाला साजेसे दिमाखदार स्वरूप देण्यात येणार असून, येत्या दोन महिन्यांत विकासकामांना गती देण्यात येईल. यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. उभादांडा येथील ‘कवितांचे गाव’ची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘कवितांचे गाव’ अधिक प्रभावी करण्यासाठी मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेचे, शून्य पटसंख्या असलेल्या शाळेचे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दालनाचे तसेच त्यांनी भेट दिलेल्या दालनाचे, अशा महत्त्वाच्या पाच दालनांना प्राधान्याने विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात मंत्री सामंत यांनी भाषा संचालकांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या. भाषा संचालक उद्या उभादांडा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असून त्यानंतर प्रभावी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
उभादांड्याच्या विकासासाठी गावातील अंतर्गत वाद बाजूला ठेवून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यिक वारशाचा विचार करावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले. गावातील नागरिकांना त्रास होईल, अशी कोणतीही व्यवस्था नको. गावात प्रवेश केल्यानंतर ‘हे कवितांचे गाव आहे’ याची अनुभूती प्रत्येकाला यावी, यासाठी सर्व फलक, दिशादर्शक आणि परिसराचे सुशोभीकरण दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
‘पुस्तकांचे गाव’ भिलारच्या धर्तीवर उभादांडा येथे साहित्य पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक दालनाची स्वतंत्र संकल्पना निश्चित करून त्याच्या संचालनासाठी प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात येईल. दालनात उपलब्ध साहित्य कसे पाहता येईल, पर्यटकांना कोणती माहिती द्यायची, दालनाची देखभाल व व्यवस्थापन कसे करायचे, याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याचे निर्देशही मंत्री सामंत यांनी दिले.
उभादांडा येथे मंगेश पाडगावकर यांच्या नावाने दर्जेदार ग्रंथालय उभारण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. ‘कवितांचे गाव’ हा केवळ पर्यटनाचा उपक्रम नसून सामाजिक आणि साहित्यिक वारसा जपणारे काम आहे. त्यामुळे प्रशासन, स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून दोन महिन्यांत उभादांड्याला नावाला शोभेल असे दिमाखदार स्वरूप द्यावे. या कामासाठी गटविकास अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार ओंकार ओतरी, गटविकास अधिकारी यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
