पुणे, ( प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार )
महाराष्ट्राच्या सामाजिक विकासाच्या इतिहासात २२ जून १९९४ हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने देशातील पहिले महिला धोरण जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचे पाऊल ठरले. या महिला धोरणाला या वर्षी ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
सन २०२२ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांचे यंदा पाचवे वर्ष आहे. सामाजिक कार्य, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता आणि क्रीडा प्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत यावर्षी सात महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (१७ सप्टेंबर) झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे होत्या.
यावेळी वैशाली घुगे यांना ‘यशस्विनी कृषी सन्मान’, सुनंदा भोसेकर यांना ‘यशस्विनी साहित्य सन्मान’, प्राची जागुष्टे-महाजन यांना ‘यशस्विनी उद्योजकता सन्मान’, मालती सगणे यांना ‘यशस्विनी सामाजिक सन्मान’, प्रगती बाणखेले यांना ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान’ आणि सविता मराठे यांना ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, रेखाताई नार्वेकर पुरस्कृत ‘युवा यशस्विनी पुरस्कार’ ॲड. परिक्रमा खोत यांना प्रदान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सुप्रिया सुळे यांनी महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढण्याची गरज व्यक्त केली. महिलांना समान अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्या निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी झाल्या पाहिजेत. महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
आज समाज अंधश्रद्धेकडे वळत असताना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्या मनात असणे गरजेचे आहे. हा विचार जिवंत असेल तर समाज बुवाबाजीमध्ये अडकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी माणसाने स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी यशस्विनी म्हणून सन्मानित झालेल्या महिलांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामातून इतर महिलांसाठी कोणते उपक्रम सुरू करता येतील, यावरही पुढील काळात विचार करण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त सर्व महिलांचे अभिनंदन करून त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अरुणभाई गुजराथी, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील, माजी मंत्री राजेश भैय्या टोपे, बी. के. अग्रवाल, विवेक सावंत, अदिती नलावडे, फरिदा लांबे, प्रज्ञा दया पवार, हर्षवर्धन देशमुख, अजित निंबाळकर यांच्यासह यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्ता बाळ सराफ यांनी केले.
