चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्याकडून तीन शाळांना ३० हजारांची मदत
आई-वडिलांच्या स्मरणार्थ कसाल, खोटले व ओरोस येथील शाळांना प्रत्येकी १० हजारांची रोख मदत; माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने उपक्रम
कसाल :
धी कसाल हायस्कूल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी परिचय मेळाव्यात संस्थेचे संचालक चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ तीन शाळांना आर्थिक मदत केली.
कै. श्री. आत्माराम बापू राणे व कै. सौ. अलका आत्माराम राणे यांच्या स्मरणार्थ राणे परिवाराच्या वतीने कसाल, खोटले व ओरोस येथील शाळांना प्रत्येकी १० हजार रुपये, अशी एकूण ३० हजार रुपयांची रोख रक्कम संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही मदत श्री. अवधूत मालणकर यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी, “आपण समाजाचे आणि शाळेचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आपल्या परीने छोटासा प्रयत्न करत असतो,” अशी भावना व्यक्त केली.
शैक्षणिक संस्थांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
