तळवडे येथे दुचाकी अपघातात शिरशिंगे येथील महिला गंभीर जखमी
पेट्रोल पंपाजवळ दुचाकी घसरून अपघात; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गोवा बांबोळी येथे हलविले
सावंतवाडी :
शिरशिंगे येथील परबवाडीमधील श्रद्धा शरद परब (वय ३६) या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्या. ही घटना तळवडे गावातील पेट्रोल पंपाजवळ घडली.
श्रद्धा परब या पतीसोबत तळवडे येथे मामांकडे गेल्या होत्या. सायंकाळी दुचाकीवरून सावंतवाडीच्या दिशेने शिरशिंगेकडे परतत असताना तळवडे येथील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. दिनेश सांगेवार व डॉ. फातिमा यांनी प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या उपचारासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी सहकार्य केले.
